
नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर जेन झींनी आंदोलन केले होते. त्यावेळी मुंबई पोलिसांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांबाबत मवाळ भूमिका घेतली होती. त्याच मुंबई पोलिसांनी आज मात्र आंदोलनकर्त्यांना दिल्ली पोलिसांप्रमाणेच वागणूक दिली. शिवाजी पार्क येथे पुकारलेले आंदोलन कुठल्याही परिस्थितीत होऊ द्यायचे नाही असा विडाच सरकारच्या आशीर्वादाने पोलिसांनी उचलल्याचे दिसले. पोलिसी बळाचा वापर करत दिसेल त्याला उचलून अक्षरशः फरफटत नेण्यात आले. अगदी सामान्य नागरिकांनाही आंदोलनकर्ते समजून जबरदस्तीने गाड्यांमध्ये कोंबले गेले.
ऑगस्ट क्रांती मैदानावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात शनिवारी झालेले आंदोलन मुंबई पोलिसांनी बळाचा वापर करून चिरडले. आजही तसेच चित्र शिवाजी पार्क येथे पहायला मिळाले. कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) आज शिवाजी पार्क येथे आंदोलनाची हाक दिली होती. झेनजींच्या यापूर्वीच्या आंदोलनाचा जबरदस्त धसका घेतलेल्या सरकारची त्यामुळे तंतरली आणि सकाळपासूनच शिवाजी पार्क परिसराला पोलिसांनी गराडा घातला. हजारो पोलीस ठिकठिकाणी तैनात ठेवण्यात आले. शिवाजी पार्क, दादर परिसरात पोलिसांनी तगडी फिल्डिंग लावली आणि तरुण-तरुणी दिसले की त्यांना उचलून थेट गाडीत कोंबण्यात आले. अक्षरशः जबरदस्तीने उचलून नेण्यात आले. असे असतानाही अनेक आंदोलकांनी हार मानली नाही. पोलिसी बळाला न जुमानता शेकडो आंदोलकांनी बेधडकपणे घोषणाबाजी करत आपले विरोध प्रदर्शन केले. पोलिसांनी ताकद लावली पण आंदोलक मागे हटले नाही.
ज्या आंदोलकांनी व मुंबईकरांनी आपल्या पोलिसांना नावाजले, त्यांचे कौतुक केले. ते मुंबई पोलिस शनिवारप्रमाणे आजही शिवाजी पार्कात दिल्ली पोलिसांप्रमाणे वागले. धरपकड, जबरदस्ती, बळाचा वापर करताना पोलिसांनी मागेपुढे पाहिले नाही. पोलिसांची तरुण पीढीबाबतची अशी बदललेली भूमिका पाहून नागरिकांमधूनही संताप व्यक्त होत आहे.
प्रमुख चेहरे नजरपैदेत
आजच्या आंदोलनासाठी काही प्रमुख चेहरे येऊ नयेत यासाठी पोलिसांनी त्यांची घरातच धरपकड केली. साम्या कोरडे यांना वडाळा टी.टी. पोलिसांनी घरामध्येच नजरपैदेत ठेवले. सनदशीर मार्गाने आंदोलन करू देण्यापासून पोलीस तरुणांना रोखत आहेत, आंदोलनाच्या ठिकाणी जाऊ देत नाहीत, घराबाहेरच पोलीस फौजफाटा तैनात केला जातोय, ही हुकूमशाही नाहीतर काय, पण आम्ही घाबरणार नाही, रडणार नाही. आंदोलन सुरूच राहणार आणि या जुलमी सरकारला भिडणार, असे साम्या कोरडे यांनी एक व्हिडीओ शेअर करत सांगितले.
300 आंदोलकांवर गुन्हे
शिवाजी पार्क परिसरात पोलिसांनी जवळपास 300 जणांना ताब्यात घेतले. काही वेळाने सर्वांना सोडून देण्यात आले. परंतु आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात येणार आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
तरीही आंदोलक भिडले
मुंबई पोलीस दिल्ली पोलिसांप्रमाणे वागत आहेत असे मेसेजेस व्हायरल झाले. मात्र त्यानंतरही न घाबरता तरुण-तरुणी शिवाजी पार्कवर धडकले. शिवाजी पार्क परिसरात मोठय़ा संख्येने पोलीस तैनात होते. त्यामुळे आंदोलकांनी शिवसेना भवन व आस्वाद हॉटेलच्या समोरच्या फुटपाथवर एकत्र येऊन विरोध प्रदर्शन केले. पोलिसांनी या वेळी शेकडो आंदोलकांची धरपकड केली.




























































