
मुंबईतल्या वॉटर टँकरचालकांनी आज अखेर संप मागे घेतल्याने गेल्या तीन दिवसांनंतर मुंबईतील पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. टँकरचालकांच्या संघटनेच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारकडून प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देण्यात आल्यामुळे संप मागे घेत असल्याचे संघटनेने जाहीर केले. यामुळे संध्याकाळनंतर टँकरमधून मुंबईतल्या प्रकल्पांना आणि गृहनिर्माण सोसायट्यांना पाणापुरवठा सुरू झाला.
मुंबईतील विहिरी आणि बोअरवेलमधून पाण्याचा उपसा करण्यापूर्वी केंद्रीय भूजल प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्याची केंद्र सरकारने अट घातली होती. त्याशिवाय इतरही काही नवीन नियम टँकरचालकांसाठी अनिवार्य करण्यात आले होते. नव्या अटी व नियमांच्या निषेधार्थ मुंबईतल्या वॉटर टँकरचालकांनी रविवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला होता. टँकरचालकांच्या संपामुळे सरकारी प्रकल्प आणि खासगी गृहनिर्माण प्रकल्पांचा पाणीपुरवठा बंद झाला. सिमेंटचे रेडीमिक्स प्लॅण्टचे काम पाण्याअभावी ठप्प झाले होते. त्यामुळे या संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात टँकरचालकांसोबत बैठक घेऊन चर्चा करून त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई उपनगर जिह्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना फोन करून संपामध्ये मार्ग काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर टँकरचालकांनी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची भेट घेऊन पुन्हा चर्चा केली. यापुढे टँकरचालकांना नोटीस पाठवणार नाही असे आश्वासन दिले. टँकरचालकांच्या मागण्यांबाबत महापालिका आयुक्तांसोबत चर्चा करण्याचे आश्वासनही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
भाजप-मिंध्यांमुळेच मुंबईत पाण्याची समस्या : आदित्य ठाकरे
सरकारच्या अनास्थेमुळे मुंबईत टँकरचालकांचा संप झाल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. सरकारच्या निर्णयामुळेच ही समस्या निर्माण झाल्याची टीकाही त्यांनी ‘एक्स’वर केली आहे. टँकरचालकांच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांशी बोलून टँकरचालकांच्या प्रश्नावर तोडगा काढावा, असेही त्यांनी म्हटले आहे. मात्र सरकार यासाठी उत्सुक नसल्याचे पाहून आश्चर्य वाटते, असेही ते म्हणाले. गेल्या वर्षीही टँकरचालकांनी असाच संप केला होता. त्यावेळी भाजपचा दबाव आणि महानगरपालिकेने दिलेल्या आश्वासनामुळे त्यांनी संप मागे घेतला होता, असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले आहे. 2021 मध्ये सुरू केलेला खारपाणी शुद्धीकरण प्रकल्प भाजप समर्पित मिंधे सरकारने रद्द केला नसता तर आतापर्यंत मुंबईत पाण्याची कमतरता भासली नसती, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
It’s surprising to see that the State Government is not keen to resolve Mumbai’s issues.
The Mumbai Water Tanker Association has been on a strike for 2 days- because the BMC has gone back on its assurances, given because of bjp pressure last year.
The @mybmc has already…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 9, 2026































































