मुंबईतून पालखीसोबत आलेल्या तरुणावर शिर्डीजवळ गोळीबार, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यभरातील विविध ठिकाणच्या पालख्या शिर्डीमध्ये दाखल होत आहेत. दरम्यान, मुंबईच्या गोरेगाव येथील आलेल्या द्वारकामाई पालखीमध्ये गुरुवारी दुपारच्या सुमारास पुसद येथील एका तरुणाने पालखीमध्ये आलेल्या साईभक्त तरुणावर गोळीबार केला आहे. या घटनेत हा तरुण जखमी झाला असून, गोळीबार करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, भरदिवसा पालखीतील तरुणावर गोळीबार झाल्याने शिर्डी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नीलेश पवार असे जखमी तरुणाचे नाव असून, विकी भांगे (वय 30), रा. पुसद, जि. यवतमाळ याला ताब्यात घेण्यात आले आहे.

गोरेगाव येथील द्वारकामाई पालखी शिर्डीजवळील सावळीविहीर येथे नाष्टय़ासाठी थांबली होती. त्या पालखीतील नीलेश पवार हा इतरांना नाष्टा वाटत होता. तेव्हा विकीने त्याच्यावर दोन राउंड फायर केले. जखमी नीलेश पवार आणि विकी दोघेही यवतमाळ जिह्यातील पुसदचे रहिवासी असून, पवार सध्या मुंबईतील गोरेगाव येथे राहतो. मुंबईहून पालखीत चालत येत असताना, त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. पवार याने दोन वर्षांपूर्वी विकीच्या बहिणीला पळवून नेऊन लग्न केले आहे. त्याचाच राग मनात धरून त्याने नीलेशवर गोळीबार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गावठी कट्टय़ासह आरोपीला शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.