घुमघुम घुमवून भाजपने ठाणे मिंध्यांना सोडले; नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीने नाईक कंपनी नाराज

ठाण्यासाठी अडून बसलेल्या भाजपने घुमघुम घुमवून अखेर हा मतदारसंघ मिंध्यांना सोडला आहे. त्यामुळे तोंडाला फेस आलेल्या मिंध्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दोन दिवस आधी नरेश म्हस्के यांचे नाव जाहीर केले आहे. मात्र असे असले तरी गेल्या महिनाभरापासून कोपराला गूळ लावत प्रचाराला जुंपलेल्या संजीव नाईक यांचा ऐनवेळी पत्ता कट केल्याने नाईक कंपनी नाराज झाली आहे. ही जागा शिंदे गटाला सोडायचीच होती तर आम्हाला कशाला कामाला लावले, असा संताप नाईकांच्या कार्यकर्त्यांनी केल्याची चर्चा आहे. यामुळे कमळाबाईच्या या खेळाने मिंध्यांच्या बोलघेवड्या नेत्यांच्या वाटेत असंतोषाचे काटेच पेरले आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिंध्यांच्या अपरोक्ष कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करून अप्रत्यक्षपणे ठाणे व पालघर मतदारसंघावर दावा ठोकला होता. पालघरमधून राजेंद्र गावीत यांना कमळ चिन्हावर निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे जाहीर वक्तव्य करण्यास भाग पाडले. त्याचवेळी आमदार संजय केळकर व अन्य नेत्यांनी ठाण्यावर आमचा कसा नैसर्गिक हक्क आहे अशा पुड्या सोडल्या. यामागे ‘सागर’ बंगल्यातीलच बोलवता धनी असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे गोची झालेल्या मिंध्यांना या दोन्ही जागांवर आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करता आली नाहीत. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस राहिल्याने घायकुतीवर आलेल्या मिंधे गटाने सोमवार व मंगळवारी दिल्लीत लॉबिंग करून अखेर ठाण्याची जागा पदरात पाडून घेतली. त्यानंतर आज नरेश म्हस्के यांचे नाव जाहीर करण्यात आले.

अंतर्गत नाराजीचा फटका बसणार

मिंधे गटातून सुरुवातीला प्रताप सरनाईक यांना उमेदवारीसाठी गळ घालण्यात आली होती. मात्र त्यांनी यास नकार दिल्याने नरेश म्हस्के व मीनाक्षी शिंदे यांनी आपापल्या नावांची सोशल मीडियातून चर्चा घडवून आणली. यात म्हस्के यांनी बाजी मारली असली तरी त्यांच्या नावाला मिंधे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे. या अंतर्गत नाराजीचा त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

नवी मुंबईत कोंडी होणार

संजीव नाईक यांनी संभाव्य उमेदवार असल्याचे सांगत भाईंदरमधून आपल्या प्रचाराला सुरुवात केली होती. त्यांनी भाजपबरोबरच शिंदे गट व अजित पवार गटाच्या नेत्यांशीदेखील वाटाघाटी केल्या. मात्र ऐनवेळी त्यांचा पत्ता कट करत म्हस्केंच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकण्यात आली. त्यामुळे नाईक कुटुंब प्रचंड संतप्त झाले असून म्हस्केंची नवी मुंबईत कोंडी करण्याचा प्लॅन सुरू असल्याची चर्चा आहे.