खूनी हल्ल्यात जखमी झालेल्या अंकुश चत्तर यांचा मृत्यू, भाजप नगरसेवक शिंदेसह पाच आरोपींना अटक

नगर येथे जुन्या वादावरून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अंकुश चत्तर यांच्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकारामुळे नगर शहरामध्ये एकच खळबळ उडाली होती. या घटनेच्या नंतर पोलिसांनी याप्रकरणी दोन पथके नेमून आरोपींचा शोध सुरू केला होता. या हल्ल्यात चत्तर गंभीर जखमी झाले होते. यावेळी त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र आज पहाटे त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये भाजप नगरसेवक स्वप्निल शिंदेंसह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी याप्रकरणी तात्काळ तपास करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार पहिल्यांदा दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर काल दिवसभरात स्थानिक गुन्हा आयोजन विभागाचे पथक इतर आरोपींचा शोध घेत होते. रात्री उशिरापर्यंत उर्वरित तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये भाजपा नगरसेवक स्वप्निल शिंदे, अभिजित बुलाख, सुरज ऊर्फ मिक्या कांबळे, विभ्या कांबळे, महेश कु-हे, राजु फुलारी आणि इतर सात ते आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, नगरसेवक स्वप्नील शिंदे याच्यासह पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.