देशभरात ‘नीट’ची आज फेरपरीक्षा; विद्यार्थ्यांसह पालकांची धाकधुक वाढली, 22 लाख 79 हजार विद्यार्थी परीक्षा देणार; कडक सुरक्षा व्यवस्था तैनात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेपरफुटीनंतर देशभरात गाजलेली आणि विद्यार्थ्यांच्या मनात धडकी भरवणारी नीट (यूजी) फेरपरीक्षा उद्या, रविवार 21 जून रोजी होणार आहे. उद्या देशभरातील 22 लाख 79 हजार उमेदवार परीक्षा देणार आहेत. विद्यार्थी नीटची फेरपरीक्षा देणार आहेत. पेपरफुटी आणि गैरप्रकारांच्या आरोपानंतर रद्द करण्यात आलेली मुख्य परीक्षा पुन्हा नव्याने घेतली जात असून, यात आधीच्या परीक्षेला बसलेले आणि नोंदणी केलेले सर्व विद्यार्थी पात्र आहेत.

राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीची (नीट-यूजी) फेरपरीक्षा 21 जूनला देशभरात आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेदरम्यान पेपरफुटी रोखण्यासाठी सुरक्षेत मोठय़ा प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रांवर ‘भिंतीवरील घडय़ाळ’ अनिवार्य करण्यात आले आहे. ‘एनटीए’तर्फे मे महिन्यात घेण्यात आलेल्या नीट-यूजी परीक्षेत पेपरफुटी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. या प्रकरणी चौकशी करत सीबीआयने अनेकांना ताब्यात घेतले आहे. मात्र, पेपरफुटीमुळे पुन्हा अभ्यास करून फेरपरीक्षा देण्याची वेळ देशभरातील लाखो विद्यार्थ्यांवर आली आहे. रविवारी होणाऱया परीक्षेसाठीच्या प्रश्नपत्रिका वायूदलाने परीक्षा केंद्रावर पोहोचवल्या जाणार आहेत. फेरपरीक्षा देशभरातील 551 शहरांमध्ये घेतली जाणार आहे. निष्पक्ष देखरेखीसाठी 6669 स्वतंत्र निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. मे महिन्यातील परीक्षेवेळी 6 हजार निरीक्षक नियुक्त करण्यात आले होते. फेरपरीक्षेदरम्यान उमेदवारांना किंवा नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या शंका अथवा गैरप्रकारांबाबत तक्रार नोंदवण्यासाठी एनटीएने नव्या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे.

फेरपरीक्षेसाठी वाढीव वेळ

फेरपरीक्षा वेळ दुपारी 2 ते 5.15 या वेळेत होणार आहे. उमेदवारांना 15 मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत. तर दिव्यांग उमेदवारांना 6ः20 वाजेपर्यंतची वेळ दिली जाणार आहे. परीक्षेसाठी उमेदवारांना सकाळी 11 ते दुपारी 1.20 या वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे. दुपारी 1.30 नंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही. बायोमेट्रिक पडताळणीत तांत्रिक अडचण आल्यास लेखी हमीपत्र घेऊन प्रवेश देण्याची मुभा कायम ठेवण्यात आली आहे.

मुलांच्या भविष्याशी जुगार खेळणे बंद करा

नागपूरच्या विद्यार्थ्याला नीट परीक्षेसाठी थेट अबूधाबीचे सेंटर आल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या मुद्दय़ावरून थेट केंद्र सरकार आणि एनटीएच्या कारभारावर जोरदार हल्ला चढवला. राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, जी सिस्टम एका मुलाला त्याच्या स्वतःच्या शहरात परीक्षा केंद्र देऊ शकत नाही. उलट त्याला थेट परदेशात पाठवते. अशा सिस्टमला परीक्षा घेण्याचा कोणताही अधिकार नाही. ही आता शिक्षण व्यवस्था राहिली नाही, तर एका संपूर्ण पिढीच्या पैशांची, वेळेची आणि मानसिक शांततेची वसुली आहे. मुलांच्या भविष्याशी जुगार खेळणे बंद करा, असे राहुल गांधींनी म्हटले.