भाजपसोबत युती नाही; एआयएडीएमकेची घोषणा

आगामी 2024च्या लोकसभा निवडणुकीआधी ‘एनडीए’ला जोरदार झटके बसत आहेत. एकीकडे ‘इंडिया’ आघाडीत देशातील विविध पक्ष सहभागी होत असताना ‘एनडीए’तील पक्ष दूर जात आहेत. तामिळनाडूमध्येही भाजपला जोरदार झटका बसला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत कोणतीही युती केली जाणार नाही, अशी मोठी घोषणा एआयएडीएमकेचे नेते डी. शिवकुमार यांनी सोमवारी केली.

‘ऑल इंडिया अन्ना द्रविड मुन्नेत्र कळघम’ (एआयएडीएमके) नेते डी. शिवकुमार यांनी तामीळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांच्यावर जोरदार टीका केली. अन्नामलाई यांना एआयएडीएमकेसोबत कोणतीही आघाडी नकोय. परंतु भाजप कार्यकर्त्यांना ती हवी आहे. आमच्या नेत्यावर होणारी टीका आम्ही का सहन करायची? आम्ही तुमच्या सोबत का फरफटत जावे? भाजप तामिळनाडूत पाय रोवू शकत नाही. तुमची वोटबँक किती आहे, हे सर्वांना माहिती आहे. तुम्हाला या ठिकाणी आमच्यामुळे ओळखले जाते, असेही डी. शिवकुमार या वेळी म्हणाले.