नगर जिल्ह्यात महिनाभरापासून ‘कोविशिल्ड’चा पुरवठा नाही, झेडपीकडून एक लाख डोसची मागणी

जिल्ह्यात कोरोनाची स्थिती उद्भवल्यास आरोग्य विभागाची सज्जता तपासण्यासाठी नुकतीच रंगीत तालीम घेण्यात आली. परंतु, 1 नोव्हेंबरपासून कोविशिल्ड लसीचे डोस संपले आहेत. या लसीचे 1 लाख डोस मिळावेत, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने नाशिक येथील आरोग्य उपसंचालकांकडे
केली आहे.

नगर जिह्यात 2020 मध्ये आलेली पहिली लाट व त्यानंतर 2021 मध्ये झालेल्या कोरोनाच्या उद्रेकात बाधितांचा आकडा कमालीचा वाढला होता. त्यानंतर जिल्हाभरात लसीकरणाला मोठा प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत 85 टक्के नागरिकांनी पहिला, तर 67.9 टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. मोठय़ा प्रमाणात लसीकरण झाल्यानंतर कोविड रुग्णसंख्या कमी झाली. ज्या रुग्णांनी पहिला डोस कोविशिल्डचा घेतला होता, त्या रुग्णांनी दुसरा डोस कोविशिल्डचा घेणे पसंत केले. त्याचबरोबर कोव्हॅक्सिन लसही उपलब्ध करून देण्यात आली होती.

सध्या चीनमध्ये कोरोना रुग्णवाढ होत असल्याने देशातील तयारीबाबत रंगीत तालीम घेण्यात आली. यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून माहिती घेतली असता, नोव्हेंबरपासून कोविशिल्ड लस शिल्लकच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली. महिनाभरापासून कोविशिल्डचे लसीकरण ठप्प असून, केवळ कोव्हॅक्सिन उपलब्ध आहे. त्यामुळे ज्यांनी यापूर्वी कोविशिल्ड लस घेतली, त्यांना पुढील डोस मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

कोव्हॅक्सिनचे 27 हजार डोस

 नगर जिह्यात कोविशिल्ड नोव्हेंबरपासून शिल्लक नाही, तर कोव्हॅक्सिनचे अवघे 27 हजार डोस शिल्लक आहेत. कोविशिल्डच्या 1 लाख लसीच्या मात्राची मागणी नाशिक आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे केली आहे. तथापि, लस उपलब्ध झाल्या नाहीत.

‘बुस्टर डोस’कडे नागरिकांची पाठ

नगर जिह्यात 18 ते 45 वयोगटातील 17 लाख 21 हजार 904 युवकांनी पहिला, तर 13 लाख 17 हजार 676 युवकांनी दुसरा डोस घेतला. 45 ते 60 वर्षांतील 6 लाख 84 हजार 214 नागरिकांनी पहिला, तर 5 लाख 73 हजार 693 नागरिकांनी दुसरा डोस घेतला. बुस्टर डोस मात्र अवघ्या 6.1 टक्के नागरिकांनीच घेतला.