
पावसाळ्याच्या तोंडावर रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर तेलाचा तवंग आढळून आला आहे. त्यामुळे अलिबाग, मुरुड, उरणचे समुद्रकिनारे काळवंडले असून प्रदूषणामुळे समुद्रजीव धोक्यात आले आहेत. जहाजांमधील तेल समुद्रात सोडण्यात येत असल्याने त्याचा काळसर तवंग सगळीकडे पसरत असल्याने प्रदूषणाचे प्रमाण वाढण्याचा धोका तज्ज्ञ व पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला आहे. या तेलतवंगांचा पर्यटनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
मुंबई बंदरात दिवसेंदिवस जलवाहतूक वाढत असल्याने त्याचे दुष्परिणाम आता कोकण किनारपट्टीवर दिसण्यास सुरुवात झाली आहे. पावसाळ्याच्या आधी मालवाहू जहाजांच्या देखभाल दुरुस्तीची कामे सुरू असतात. याच्याव्यतिरिक्त जिल्ह्यातील मासेमारी नौकांना पावसाळ्यात मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या नौकांच्या डागडुजीचे कामही पावसाळ्याच्या सुरुवातीला हाती घेण्यात येते. ही डागडुजीची कामे सुरू असताना मालवाहू जहाजे तसेच मासेमारी नौकांमधील खराब झालेले ऑइल समुद्रात सोडण्यात आले आहे. त्याचा तवंग गोळ्यांच्या स्वरूपाने समुद्रकिनाऱ्यावर वाहून येत आहे.
प्रदूषणामुळे समुद्रजीव धोक्यात
अलिबाग, मुरुडच्या किनाऱ्यावर दर शनिवार, रविवार व अन्य सुटीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. पण या तेलतवंगामुळे त्यांना समुद्रकिनाऱ्यावर चालणे कठीण झाले आहे.
पोहण्यासाठी समुद्रात उतरणाऱ्या पर्यटकांच्या अंगालाही तवंग चिकटत असल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे. या तवंग संकटाचा पर्यटन व्यवसायावरही परिणाम होण्याची भीती स्थानिक व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
तातडीने पावले उचलण्याची गरज
तेलतवंगामुळे खारफुटीसारख्या वनस्पती व माशांच्या विविध प्रजातींना धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात मासेमारी बंद असली तरी त्याचा दीर्घकालीन परिणाम होणार असून तेलतवंगाचे संकट रोखण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांसह मच्छीमार बांधवांनी केली आहे.




























































