ओमायक्रोन मंत्रालयात पोहोचला; दोन पोलीस आणि एक क्लार्क पॉझिटिव्ह

राज्याची चिंता वाढवणारा ओमायक्रोन थेट मंत्रालयात पोहोचला आहे. कल्याणचे रहिवासी असलेले परंतु मंत्रालयात डय़ुटीवर असलेले दोन पोलीस आणि एक लिपिक ओमायक्रोन पॉझिटिव्ह असल्याची माहिती कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी दिली.

महाराष्ट्रातील पहिला ओमायक्रोनचा रुग्ण डोंबिवलीत सापडला होता. हा रुग्ण दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून आला होता तर नायजेरियातून आलेल्या दुसऱया रुग्णालादेखील ओमायक्रोन झाल्याचे निदान झाले होते. मात्र या दोन्ही रुग्णांनी त्यावर यशस्वी मात केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आता पुन्हा ओमायक्रोनची लागण झालेले 3  रुग्ण केडीएमसी हद्दीत सापडले असून हे तिन्ही रुग्ण मंत्रालयातील कर्मचारी आहेत. मागील आठवडय़ात मंत्रालयात  करण्यात आलेल्या तपासणीत एक पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या स्कॅबचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले होते. तर पॉझिटिव्ह आल्यानंतर हा कर्मचारी घरातच विलगीकरणात राहत होता. त्याला ओमायक्रोनची लागण झाल्याचा अहवाल मिळताच त्याला पालिकेच्या विलगीकरणात दाखल केले.

आज आणखी दोघांचा ओमायक्रोन अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यातील एक जण मंत्रालयात पोलीस कर्मचारी असून दुसरा लिपिक आहे. तिघांना पालिकेच्या कल्याण आर्ट गॅलरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत तर त्यांच्या कुटुंबीयांची तपासणी करण्यात आली असून त्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. दरम्यान, आज शहरात 67 रुग्ण सापडले आहेत. उपचार घेणाऱया रुग्णांची संख्या 354 वर पोहोचली आहे. मात्र यातील 90 टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत किंवा अतिशय सौम्य लक्षणे असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.