सासूमुळे वाटणी झाली पण वाटय़ाला सासूच आली! विरोधकांच्या घोषणांनी सरकार जेरीस

राज्यात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. बोगस बी-बियाणे आणि खतांची परिस्थिती गंभीर आहे. सरकारच्या टोळ्या मात्र वसुली करीत सुटल्या आहेत. शेतकरी संकटात आहेत सरकार मात्र मदमस्त आहे, अशा शब्दांत आज विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा घडवून न आणल्याच्या निषेधार्थ सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत विधानसभेतून महाविकास आघाडीच्या सदस्यांनी सभात्याग केला. त्याआधी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जबरदस्त आंदोलन करण्यात आले. सासूमुळे वाटणी झाली पण वाटय़ाला सासूच आली, घटनाबाहय़ कलंकित सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक पवित्रा धारण केल्याने सरकार हादरले आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांचा प्रश्न मांडण्यात आला. पावसाने दिलेली ओढ, खोळंबलेल्या पेरण्या, दुबार पेरणीचे संकट यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी या विषयावर स्थगत प्रस्ताव मांडत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा घडवून आणण्याची मागणी केली. पण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्थगन प्रस्ताव फेटाळला.

 त्यावर बाळासाहेब थोरात संतप्त झाले. ते म्हणाले की, आतापर्यंत राज्यातल्या अनेक भागांमध्ये पन्नास टक्क्यांहून कमी पाऊस पडला आहे. परिस्थिती अत्यंत गंभीर असून शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे. सरकार शेतकऱ्यांना धीर देत नाही.

दिल्ली वारीतच सरकार व्यस्त

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने बघायला सरकारला वेळ नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप यातच सरकार व्यस्त आहे. त्यात छोटय़ा छोटय़ा गोष्टींसाठी दिल्ली वाऱ्या कराव्या लागतात. शेतकऱ्यांच्या दारात सरकार कधी जाणार? शेतकऱ्यांचे संकट कधी समजून घेणार, असा संतप्त सवाल बाळासाहेब थोरात यांनी केला.

सरकारच्या टोळय़ा वसुलीत मग्न

बी-बियाणे आणि खतांची परिस्थिती राज्यात गंभीर झालेली आहे. बोगस बियाणे बाजारात मोठय़ा प्रमाणावर आल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यासंदर्भात कारवाया करून शेतकऱ्यांना धीर द्यायचे सोडून सरकारच्या काही टोळय़ा जिह्यांमध्ये वसुली करत फिरत आहेत याकडे थोरात यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. स्थगन प्रस्ताव नाकारल्याने अखेर महाविकास आघाडीच्या सदस्यांनी निषेध करीत सभात्याग केला.