दहशतवाद्याचा मृतदेह ताब्यात घेताना पाकिस्तानचा गोळीबार

कश्मीरच्या बारामुल्लामधील एलओसीजवळ उरी, हथलंगा येथे तीन दहशतवादी पाकव्याप्त जम्मूतील नियंत्रण रेषेतून हिंदुस्थानात घुसण्याचा प्रयत्न करत होते. या तीन दहशतवाद्यांचा हिंदुस्थानी लष्कराने खात्मा केला. दोन दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले, परंतु एका दहशतवाद्याचा मृतदेह ताब्यात घेताना पाकिस्तानी लष्कराने गोळीबार केला. त्यामुळे दहशतवादाविरोधातील कारवाईत पाकडे अडथळा आणत असल्याचे उघड झाले आहे.

उरी भागात हिंदुस्थानी लष्कर आणि कश्मीर पोलीस यांची संयुक्त कारवाई सुरू आहे. आज पाचव्या दिवशी पहाटे 6 वाजल्यापासून कारवाईला सुरुवात झाली. तब्बल आठ तासांनंतर दुपारी 2 वाजता ही मोहीम जवानांनी फत्ते केली, अशी माहिती पीर पंजाल ब्रिगेडचे कमांडर पीएमएस ढिल्लन यांनी दिली. दोन दहशतवाद्यांचे मृतदेह हाती लागले. तिसऱयाचा मृतदेह सीमारेषेजवळ पडला होता, परंतु पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार सुरू झाल्याने मृतदेह ताब्यात घेता आला नाही. यावरून पाकिस्तानी लष्कर दहशतवाद्यांना मदत करत असल्याचे उघड झाल्याचे ढिल्लन यांनी सांगितले. हिंदुस्थानी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये गेल्या पाच दिवसांपासून संघर्ष सुरू आहे.

चकमक सुरूच
अनंतनागच्या कोकेरनाग येथील जंगलातही दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे. गेल्या पाच दिवसांत लष्कराचे दोन अधिकारी आणि पोलीस उपअधीक्षक शहीद झाले, तर चौथ्या दिवशी एका बेपत्ता जवानाचा मृतदेह सापडला. दरम्यान, हिंदुस्थानी लष्कराच्या कारवाईत 12 सप्टेंबर रोजी राजौरीमध्ये दोन दहशतवादी मारले गेले तर हिंदुस्थानी लष्कराचा एक जवान शहीद झाला होता.