‘माफीनामा जाहिरातींच्या इतक्याच आकारात छापला का?’ सुप्रीम कोर्टाने बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांच्यावर ओढले ताशेरे

पतंजली आयुर्वेद कंपनी विरुद्ध दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं आज खडसावत प्रश्न केला की, ‘त्यांनी आज वृत्तपत्रांमध्ये दिलेला माफीचा आकार त्यांच्या उत्पादनांच्या पूर्ण पानांच्या जाहिरातींसारखा आहे का?’ पतंजलीचे संस्थापक रामदेव आणि बाळकृष्ण यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले की, त्यांनी न्यायालयासमोर माफीनाम्याचा नवा सेट दाखल केला आहे.

काल माफी मागितली गेली आणि ती आधी मागायला हवी होती, असं खंडपीठानं म्हटलं. रोहतगी म्हणाले की, 67 वृत्तपत्रांमध्ये 10 लाख रुपये खर्चून माफीनामा प्रकाशित करण्यात आला. ‘माफी ठळकपणे प्रकाशित केली गेली आहे का? तुमच्या आधीच्या जाहिरातींप्रमाणेच फॉन्ट आणि आकार ठेवण्यात आला आहे का?’ असा सवाल न्यायमूर्ती हिमा कोहली यांनी केला.

कंपनीने लाखो रुपये खर्च केल्याचे रोहतगी यांनी सांगितले तेव्हा न्यायालयानं उत्तर दिलं, ‘आम्हाला याने फरक पडत नाही’.

न्यायालयानं नमूद केले की पतंजली विरुद्धच्या खटल्याबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) विरुद्ध ₹ 1000 कोटी दंडाची मागणी करणारा अर्ज प्राप्त झाला आहे. ‘ही प्रॉक्सी याचिका आहे का? आम्हाला संशय आहे’, खंडपीठाने विचारल्यावर रोहतगी यांनी त्यांच्या क्लायंटचा त्याच्याशी काहीही संबंध नाही यावर जोर दिला.

त्याविरुद्ध दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीच्या काही तास अगोदर, पतंजली आयुर्वेदने राष्ट्रीय दैनिकांमध्ये माफी मागितली आणि न्यायालयाचा त्यांना अत्यंत आदर आहे आणि त्यांच्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही अशा आशयाच्या छोट्या जाहिराती दिल्या.

पतंजलीचे संस्थापक, योगगुरू रामदेव आणि त्यांचे सहकारी बाळकृष्ण यांना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांवर उपचार करण्याच्या कंपनीच्या भ्रामक दाव्यांवर ताशेरे ओढल्यानंतर हे प्रकरण समोर आलं आहे. न्यायालयानं याआधी रामदेव आणि बाळकृष्ण यांची माफी नाकारली आहे. 16 एप्रिल रोजी झालेल्या शेवटच्या सुनावणीत दोघांना आज हजर राहून माफी मागण्याचा हेतू स्पष्ट करण्यास सांगण्यात आलं होतं.

एका राष्ट्रीय हिंदी दैनिकात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत पतंजलीनं सर्वोच्च न्यायालयाचा अत्यंत आदर असल्याचं म्हटलं आहे. ‘आमच्या वकिलांनी आश्वासन देऊनही जाहिराती प्रकाशित करण्यात आणि पत्रकार परिषदा आयोजित करण्यात झालेल्या चुकांसाठी आम्ही मनापासून माफी मागतो. ही चूक पुन्हा होणार नाही यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत’, असं जाहिरातीत म्हटलं आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीनंतर माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना रामदेव म्हणाले होते, ‘मला जे करायचे होते ते मी बोललो. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.’

रामदेव आणि बाळकृष्ण यांची यापूर्वीची माफी नाकारताना न्यायालयाने ही पत्रे आधी माध्यमांना पाठवण्यात आल्याचं नमूद केलं होतं. न्यायमूर्ती हिमा कोहली म्हणाल्या, ‘जोपर्यंत प्रकरण न्यायालयाl पोहोचलं, तोपर्यंत विरोधकांना आम्हाला प्रतिज्ञापत्रं पाठवणं योग्य वाटलं नाही. ते प्रसिद्धीवर स्पष्टपणे विश्वास ठेवतात’.

खंडपीठातील न्यायमूर्ती ए अमानुल्ला यांनीही इशारा दिला होता की, ‘माफी मागणे पुरेसे नाही. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील’.

हे प्रकरण कोविडमधील वर्षांचं आहे, जेव्हा पतंजलीने 2021 मध्ये कोरोनिल हे औषध लाँच केले आणि रामदेव यांनी ‘COVID-19 साठी पहिले पुरावे-आधारित औषध’ म्हणून त्याचे वर्णन केलं होतं. कोरोनिलकडे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमाणपत्र असल्याचा दावाही पतंजलीने केला होता, परंतु इंडियन मेडिकल असोसिएशनने याला ‘पूर्णपणे खोटं’ म्हटलं आहे.