अमेरिकेतील विद्यापीठांना छावणीचं स्वरुप; विद्यार्थ्यांची निदर्शने नियंत्रित करण्यासाठी दंगलविरोधी पथकं तैनात

इस्रायलच्या हमासबरोबरच्या युद्धानंतर अमेरिकेतील अनेक विद्यापीठांमध्ये विद्यार्थांनी इस्रायलच्या भूमिकेविरोधात निदर्शने केली. काही ठिकाणी तर निदर्शनांना हिंसक वळण लागलं. यानंतर स्थानिक पोलिसांनी अनेक आंदोलक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं होतं. दरम्यान, आता इथल्या विद्यापीठांमधील परिस्थिती नियंत्रणात असून विद्यापीठांमध्ये दंगल विरोधी पथकं जागोजागी तैनात करण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यापीठांना छावणीचं स्वरुप आलं आहे.

कॅलिफोर्निया विद्यापीठ, लॉस एंजेलिस कॅम्पसमध्ये रात्रभर झालेल्या हिंसक चकमकी झाल्या. यानंतर डझनभर पोलिस गाड्या गस्त घालत आहेत. यादरम्यान आता विरोधी निदर्शकांनी पॅलेस्टिनी समर्थक विद्यार्थ्यांच्या विभागांवर हल्ला केला.

न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया विद्यापीठात या उद्रेकाचा केंद्रबिंदू मानण्यात येत आहे. मंगळवारी रात्री उशिरा अधिकाऱ्यांनी तेथील पोलीस बंदोबस्त वाढवला.

गाझा युद्धाच्या हिंसक निषेधानंतर दंगलविरोधी पोलिसांनी यूएस महाविद्यालयांवर गस्त वाढवली आहे. कोलंबिया आणि सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कमध्ये पोलिसांनी रात्रभर गस्त घालत निदर्शकांना हुसकावून लावलं.

इस्रायलच्या हमासबरोबरच्या युद्धाविरुद्ध काही आठवडे चाललेल्या निदर्शने सक्तीने मोडून टाकल्यानंतर बुधवारी पोलिसांनी अमेरिकेतील युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये मोठ्या प्रमाणात पथकं तैनात केली.

पोलिसांच्या वाढलेल्या गस्तीमुळे काही विद्यार्थी चांगलेच हैराण झाले आहेत.

कॅम्पसमध्ये जास्त पोलीस पथकं असणं अयोग्य असल्याचं मत, विद्यार्थी मार्क टोरे 22 याने व्यक्त केलं आहे. एएफपीसोबत बोलताना त्यानं विद्यापीठातील परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी पोलिसांची उपस्थिती फारशी चांगली वाटत नसल्याचंही तो म्हणाला.

कोलंबिया आणि न्यूयॉर्कच्या सिटी युनिव्हर्सिटीमध्ये, जिथे पोलिसांनी निदर्शकांना बाहेर हाकलले, तेव्हा काही विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांनी वापरलेल्या आक्रमक नितीचा निषेध केला.

‘आमच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला, क्रूरपणे अटक करण्यात आली आणि सुटका होण्यापूर्वी मला सहा तासांपर्यंत रोखून धरण्यात आले, चक्क धक्काबुक्की करण्यात आली, चेंगराचेंगरी करण्यात आली, कापून टाकण्यात आले’, अशी माहिती आणखी एका विद्यार्थ्यानं AFP ला सांगितली.

इसाबेल नावाच्या विद्यार्थिनीनं सांगितलं की, ‘आम्ही डोक्याला गंभीर दुखापत, आघात झाल्यासारख्या गोष्टी पाहिल्या आहेत, पोलिसांच्या छावणीत कोणीतरी बेशुद्ध पडलं होतं, काहींना तर पायऱ्यांवरून खाली फेकलं होतं’.

कोलंबिया आणि CUNY येथे सुमारे 300 विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली, असं पोलीस आयुक्त एडवर्ड कॅबन यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितलं.