ठाण्यात गोळीबार करून फरार झालेला पोलीस जेरबंद, रिव्हॉल्व्हर जप्त

कोल्हारच्या बस स्थानकात काल आरोपी व पोलिसांचा थरार पाहावयास मिळाला. ठाणे जिह्यात दोघांवर स्वतःच्या रिव्हॉल्व्हरमधून अंदाधुंद गोळीबार करून पसार झालेल्या पोलीस दलातील आरोपीला कोल्हारमध्ये बसमधून पळून जाताना जेरबंद केले. त्याच्याकडून अमेरिकन बनावटीचे रिव्हॉल्व्हर हस्तगत केले असल्याची माहिती शिर्डीचे डीवायएसपी संदीप मिटके यांनी दिली.

सूरज देवराम ढोकरे (रा. पडगा, जि. ठाणे) असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. सूरज ढोकरे हा मुंबई पोलीस दलातील नायगाव पोलीस मुख्यालयात कार्यरत होता. त्याने ठाणे जिह्यातील पडगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अजिम अस्लम शेख व फिरोज आरिफ शेख यांच्यावर आठ गोळ्या झाडल्या होत्या. त्यामध्ये ते दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर तो पळून गेला होता. ढोकरे हा नगर येथे एका हॉटेलमध्ये मुक्काम करून नगर-नाशिक बसमधून प्रवास करीत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना मिळाली. त्यांनी पोलीस पथकाला कोल्हार येथे नाकाबंदी करण्याचे आदेश दिले होते.

तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजवरून शिर्डीचे डीवायएसपी संदीप मिटके व लोणी पोलिसांनी सापळा लावला. कोल्हार येथे बस थांबताच लोणी पोलीस व संदीप मिटके यांनी बसमध्ये घुसून त्याला जागेवर रिव्हॉल्वरसह ताब्यात घेतले.

ही कारवाई शिर्डीचे डीवायएसपी संदीप मिटके, पोलीस नाईक श्याम जाधव, अशोक शिंदे, दिनेश कांबळे, ज्ञानेश्वर गांगुर्डे व लोणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे, पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे, बाबासाहेब लबडे, दिनकर चव्हाण, एम. डी. पवार, एकनाथ सांगळे, ए. बी. फटांगरे, चालक वरपे, बी. बी. आव्हाड, व्ही. ए. हारदे, विशाल राऊत, अभिजित साळवे, गणेश साळुंके आदींनी केली. आरोपी सूरज ढोकरे याला ठाणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती शिर्डीचे डीवायएसपी संदीप मिटके यांनी दिली.

कपडे व फोन लोकेशनमुळे आरोपी सापडला!

आरोपी सूरज ढोकरे याच्या सीसीटीव्ही फुटेजवरून आणि मोबाईल लोकेशनमुळे तो बसमधून जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावत बसमध्ये रिव्हॉल्व्हरसह ताब्यात घेतले.