पंतप्रधान मोदींना आज मौत का सौदागर म्हणणे योग्यच; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

कोरोना काळामध्ये देशाचा पंतप्रधान लोकांच्या आरोग्याशी खेळतो, त्याला काँग्रेसने आज मौत का सौदागर म्हणणे योग्यच होते, त्याला आता आपण सत्तेवर बसवायचे का, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर सभेत केला. आपल्या देशाला आर्थिक संकटामध्ये नेण्याचे पाप त्यांनी केल असून 10 वर्षांमध्ये मोदींनी काढलेले कर्ज हे कुठे गेले? त्याचा वापर कोणी केला ? हे आता त्यांनी सांगावे, असे आव्हानही प्रकाश आंबेडकर यांनी दिले. आपल्याला देश टिकवायचा असेल तर या बाबींचा विचार करावा लागेल, असेही ते म्हणाले. भाजपचे राधाकृष्ण विखे उघडपणे काँग्रेसला भेटायला जातात म्हणजेच ही येथील काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांना धोक्याची घंटा आहे, असे सूचक विधानही त्यांनी केले.

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने नगर येथे उमेदवार दिलीप खेडकर यांच्यासाठी जाहीर सभेच्या आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्य समन्वयक अरुण जाधव, राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण ,राज्य उपाध्यक्ष दिलीप पिंकी शेख, दिलीप खेडकर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले, मोदींच राजकारण हे अतिशय भयानक आहे, काँग्रेस पक्ष त्यांना 2012 मध्ये मोदीला मौत का सौदागर म्हणाले होते, ती परिस्थिती आज आलेली आहे. कोरोनाच्या काळामध्ये वल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या देशातील महत्त्वाच्या संस्थेने कोरोना काळामध्ये रेमडीसीवर हे देऊ नये इतर देशांनी त्याला बंदी घातली असताना आपल्या देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या कंपनीला मुभा दिली. कारण त्यांचा मालक गुजराती होता. त्यामुळे मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहे , असा घणाघाती आरोपही आंबेडकर यांनी केला. या कंपनीने इलेक्टोरड बॉण्ड खरेदी केले आणि त्यानंतर त्यांना रेमडीसीवर विकायची परवानगी दिली गेली, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. जो माणूस पक्षाची तिजोरी भरतो व लोकांच्या जीवनाशी खेळतो त्याला आता आपण सत्तेवर बसवायचे का, असा सवाल आंबेडकर यांनी यावेळी केला.

आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती आता बिकट झालेली आहे. नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांमध्ये काय बदल केला हे सांगावे, असे जाहीर आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी दिले. मोदी सरकारने 10 वर्षांमध्ये यांनी काढलेले कर्ज हे कुठे गेले, ते पैसे कोणी वापरले, हे आपण विचारणार आहोत की नाही, देशाची आर्थिक परिस्थिती भक्कम करायची असेल तर आर्थिक कणा हा चांगला असला पाहिजे. आपल्या देशाला असा पंतप्रधान मिळाला आहे की त्याने देशाला ‘बनाना रिपब्लिक’ करून ठेवला आहे म्हणजेच कोणीही यावे, आणि टिपली मारून जावे, अशी परिस्थिती नरेंद्र मोदी यांनी करून ठेवली आहे. त्यामुळे आपला देश आता कशाच्या उंबरठ्यावर आहे हे सांगण्याची गरज राहिली नाही म्हणून आगामी काळामध्ये आता आपल्याला ओबीसी समुदायाचे राजकारण पुढे आणायचे आहे. त्यासाठी ही निवडणूक आहे. बदल हा झाला पाहिजे व तो आता आपल्यापासूनच करणे गरजेचे आहे. पाणी कालांतराने गढूळ होते व त्यानंतर आपण ते पाणी फेकून देतो तशाच पद्धतीने आता हे राजकीय पाणी गढून झाले आहे, आता ते फेकून द्या, असे आवाहनही आंबेडकर यांनी केले.

भाजपचे स्टार प्रचारक राधाकृष्ण विखे काँग्रेसच्या संपर्कात असूनही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांना ही ‘वॉर्निंग घंटा’ आहे, असा गौप्यस्फोट करत थोरतांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा स्वतः अलर्ट राहावे, असा सूचक इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला. यानंतरचा पुढचा गौप्यसोफ्ट हा करायचा आहे. परंतु तो पुण्यात करेल, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांना वॉर्निंग घंटा दिली. भाजपचे स्टार प्रचारक राज्याचे महसूल तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या संपर्कात आहेत, हे प्रकाश आंबेडकर यांनी भर सभेत तारखा निहाय सांगितले. मंत्री विखे 28 मे 2023 ला सायंकाळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना भेटले. यानंतर मल्लिकार्जुन खरगे सोलापूरहून बेंगलोरला 9 जून 2023 ला दुपारी तीन वाजता आले. तत्पूर्वी 8 जून 2023 ला मंत्री विखे यांनी खरगे यांच्याशी गुप्त बैठक केली, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.

भारतीय जनता पक्षाची माणसे ही काँग्रेसला भेटत आहेत ही काँग्रेसला चांगली परिस्थिती आहे. सध्या महाराष्ट्रातील काँग्रेस ही नेते बाळासाहेब थोरात यांच्या हातात असल्याने थोरात यांना ही चांगली स्थिती आहे. परंतु मंत्री राधाकृष्ण विखे आता काँग्रेसच्या संपर्कात आल्याने कधी काय होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांना ही “वॉर्निंग घंटा” आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

पैशांनी मते विकत घेणारे राजकारणी आहेत .ते मत विकत घेतात नंतर तुमची आमची बांधिलकी काही नाही. आता आपण पाच वर्षांनीच भेटू असे म्हणतात, दारात उभे करत नाही. त्यामुळे तुम्ही आता जागे व्हा ,कोणाच्याही आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. येत्या एक-दोन दिवसांमध्ये मी नगरमध्ये नाही तर मुंबई किंवा पुणे या ठिकाणी एक मोठा असा स्फोट करणार आहे, असेही आंबेडकर यांनी सांगितले. त्यामुळे ते काय बोलणार याची चर्चा सुरू होती.