पुणे बाजार समितीत शेतकरी वाहनचालकांची लूट, संचालक मंडळ येताच बाजार खर्च वाढला

पुणे बाजार समितीवर संचालक मंडळ येताच प्रथमच शेतकरी वाहनचालकांची लुट सुरू झाली आहे. बाजार समितीकडून वाहन प्रवेश फीच्या नावाखाली बाजारातून वाहन बाहेर पडताना आता सरसकट सर्व चारचाकी वाहनचालकाकडून १० रूपयांपासून अगदी पन्नास रूपयापर्यंत शुल्क घेतले जात आहे. आधीच इंधन, खते, मशागत खर्च वाढला असताना बाजार खर्चदेखील वाढवला जात आहे. त्यामुळे संचालक मंडळ नक्की कोणाच्या हितासाठी काम करत आहे असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

गुलटेकडी मार्केटयार्डातील फळे-भाजीपाला, कांदा-बटाटा, केळी बाजारात शेतमाल खरेदीसाठी येणार्‍या तीनचाकी, चारचाकी वाहनांना पार्किंग शुल्क आकारले जाते. तर, गुळ-भुसार बाजारात खरेदीसाठी येणार्‍या चारचाकी वाहनांना पार्विंâग शुल्क आणि वाहन प्रवेश फी असे दोन्ही शुल्क आकारले जाते. वाहन प्रवेश फीसाठी पहिल्या पाच तासांसाठी १० रूपये त्यानंतर पाच तासानंतर प्रतितास दहा रूपये असे शुल्क निश्चित केले असताना बाजारात येणार्‍या वाहनांकडून प्रवेश फीच्या नावाखाली तीस रूपयांपासून काही चालकांकडून अगदी दोनशे रूपये शुल्क घेतले जात असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. काही दिवसांपुर्वी एका संचालकानेदेखील जास्ती पैसे घेतल्याच्या प्रकारावरून संबंधितांना जाब विचारला होता. मात्र, परिस्थिती जैसे थे आहे. तर, केवळ वाहन प्रवेश फीच नव्हे तर पार्विंâग शुल्कदेखील द्यावे लागते. बाजार समितीने पार्विंâगसाठी जागा निश्चित केल्या असल्या तरी ठेकेदाराकडून गुळ-भुसार बाजारात निश्चित जागाव्यतिरिक्त लागणार्‍या वाहनांकडून पार्विंâग शुल्क वसुल केले जात आहे. अवेरिया एंटरप्रायझेस ठेकेदाराकडून रस्त्यावर ताबा मारून पैसे कमविण्याचा धंदा सुरूच आहे. त्यामुळे बाजार समितीत सध्या मर्जीतल्या ठेकेदारांची चलती आहे.

दहा रूपये कलेक्शनसाठी मुख्य प्रवेशव्दार बंद

फळे व भाजीपाला बाजारात मुख्य प्रवेशव्दारातून शेतमालाची वाहने शेतमाल खाली करून पुन्हा याच रस्त्याने माघारी जात होती. आता समितीने वेळेत बाजारातील व्यवहार उरकावे यासाठी मुख्य प्रवेशव्दारातून शेतमाल खाली केलेली वाहनांना बंदी केली आहे. ही वाहने गेट क्रमांक पाच मधून जातात. त्यामुळे सुमारे हजार ते दीड हजार वाहने बाजारात येत असतात. प्रतिवाहन दहा रूपये जरी पकडले तरी सुमारे दररोज दहा ते पंधरा हजारांचे कलेक्शन आहे. या कलेक्शनसाठीच मुख्य प्रवेशव्दार बंद केले का ? अशी कुजबुज आता बाजारात सुरू झाली आहे.

शेतमाल खाली केलेली वाहने मुख्य प्रवेशव्दारातून माघारी जाण्यासाठी एक नंबर गेट खुले ठेवण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या जातील. तसेच नियमांचे उल्लंघन करून वाहनांकडून शुल्क घेणार्‍या ठेकेदारांना पुन्हा नोटीस बजाविण्यात येईल.
– डॉ.राजाराम धोंडकर, सचिव, बाजार समिती, पुणे.