राहुल गांधींची खासदारकी पुन्हा बहाल होण्याची दाट शक्यता, शिक्षेला स्थगिती मिळाल्याने दिलासा

शुक्रवारचा दिवस काँग्रेस आणि राहुल गांधी या दोघांसाठी आनंदाचा आणि महत्त्वाचा ठरला. मोदी आडनाव प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत त्यांना शिक्षा सुनावली होती. या शिक्षेमुळे त्यांची खासदारकी रद्द झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना दिलेल्या शिक्षेला आणि दोषसिद्धीला स्थगिती दिल्याने त्यांची खासदारकी पुन्हा बहाल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत राहुल गांधी यांच्या शिक्षेला असलेली स्थगिती कायम राहील. सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना अवमान प्रकरणात सर्वाधिक शिक्षा देण्याची गरज काय होती असा सवालही विचारला आहे.

गुजरातमधील कनिष्ठ न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवल्यानंतर त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करत असल्याचा आदेश लोकसभा सचिवालयातर्फे जारी करण्यात आला होता. राहुल गांधी हे केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडून आले आहेत. कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेसोबतच दोषसिद्धीवरही स्थगिती आणली आहे. यामुळे राहुल गांधी यांचा संसदेचा मार्ग पुन्हा खुला झाला आहे. खासदारकी रद्द झाल्यानंतर वायनाडमध्ये पोटनिवडणुका झाल्या असत्या तर राहुल गांधी यांची खासदारकी गेली असती, मात्र इथे पोटनिवडणुका अद्याप झालेल्या नाहीयेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे राहुल गांधी हे 2024 ची निवडणूक लढू शकणार अथवा नाही हा संभ्रमही दूर झाला आहे. जर सर्वोच्च न्यायालयाने ही स्थगिती दिली नसती तर राहुल गांधी यांना 2024 ची लोकसभा निवडणूक लढता आली नसती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राहुल गांधी यांचा संसदेत पुन्हा प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहेच शिवाय ते आगामी लोकसभा निवडणूकही लढवू शकणार आहेत.