ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी; शरद पवार यांचा अजितदादांना इशारा

राजकारणासाठी काहीजण गरीब लोकांना दम देत आहेत; मात्र ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी आहेत, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांचे नाव न घेता दिला.

महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ दौंड तालुक्यातील वरवंड येथे आयोजित सभेत शरद पवार बोलत होते.

नरेंद्र मोदी हे राहुल गांधींवर टीका करतात. राहुल गांधी यांनी लोकांचे प्रश्न समजावून घेण्यासाठी कन्याकुमारीपासून पदयात्रा काढली. त्यांचे वडील राजीव गांधी, इंदिरा गांधी यांची देशासाठी काम करत असताना हत्या झाली. गांधी घराण्याच्या चार पिढय़ांनी देशासाठी काम केले याचे भान मोदींना नसून त्यांच्यात व्यापक दृष्टिकोन नसल्याची टीका शरद पवार यांनी केली.
शरद पवार म्हणाले, माझ्या काळात कुरकुंभ आणि चाकण एमआयडीसी यासह आदी उद्योगधंदे आणले. त्यामुळे हजारो तरुणांच्या हाताला काम मिळाले. विकासाच्या कामात राजकारण आणायचे नसते. काहीजण राजकारणासाठी गरीब लोकांना दम देत आहेत. त्याच गावच्या बोरी आणि त्याच गावच्या भाबळी आहेत.

आमदार भास्कर जाधव म्हणाले, शिवसेना आणि राष्ट्रवादीबरोबर गद्दारी झाली. मात्र, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 35 जागा निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत. अजितदादा हे आता दादा राहिले नाहीत. त्यांचे दिल्लीत गब्बरसिंग बसले आहे. मोदी म्हणतात की, शरद पवार यांनी त्यांच्या कार्यकाळात काय केले? याउलट मोदींनी दहा वर्षांत काय केले ते सांगावे. मोदींची राजकीय कबर फोडल्याशिवाय महाराष्ट्रातील जनता राहणार नाही, असा घणाघातही भास्कर जाधव यांनी केला.

यावेळी राजेश टोपे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, नामदेव ताकवणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शरदचंद्र सूर्यवंशी, अनिल सोनवणे, जगन्नाथ शेवाळे, बापूसाहेब देशमुख, आप्पासाहेब पवार, सक्षणा सलगर, प्रीती मेनन, विठ्ठल खराडे, रामभाऊ टूले, भूषणसिंहराजे होळकर, आपचे रवींद्र जाधव, विकास लवांडे, किरण वाळुंजकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

जेलमध्येजाऊ नये म्हणून भाजपबरोबर – रोहित पवार

ही लढाई सामान्य व्यक्ती विरुद्ध भाजप आणि पवारसाहेब विरुद्ध भाजपमध्ये आहे. जेलमध्ये जाऊ नये म्हणून भाजपबरोबर गेल्याचा टोला आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांचे नाव न घेता लगावला. दुधाला अनुदान नाही, कांदा दहा रुपये किलो जात नाही म्हणून शेतकऱयांच्या डोळ्यात पाणी आहे. 2014 पर्यंत राज्यात पवार साहेबांमुळे सत्ता आली. अजित पवार यांना चार वेळा उपमुख्यमंत्री केले तसेच पुण्याचे पालकमंत्री केले. आता यांची फाईल फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याकडे जाते. त्यांना स्वतंत्र निर्णय घेता येत नाही.