बाहेरून झकास आतून मात्र भकास; एसआरए मुख्यालयच दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

वांद्रे पूर्व येथील अनंत काणेकर मार्गावरील एसआरए अर्थात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्यालय दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. मुख्यालयाच्या दुरुस्तीसाठी प्राधिकरणाने गतवर्षी काढलेल्या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. एसआरएच्या मुख्यालयात विविध कामानिमित्त दररोज शेकडो विकासक येतात, मात्र एकाही विकासकाने मुख्यालयाच्या दुरुस्तीच्या कामासाठी पुढाकार न घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त होतेय.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची प्रशासकीय इमारत पाच मजली असून दररोज या इमारतीत विविध कामानिमित्त हजारो नागरिक आणि विकासक येतात. या इमारतीचे उद्घाटन 26 ऑगस्ट 2010 रोजी झाले होते. अवघ्या चौदा वर्षांत मुख्यालयाच्या इमारतीची दुर्दशा झाली आहे. ही इमारत बाहेरून दिसायला झकास असली तरी आतून मात्र तिची अवस्था एकदम भकास झाली आहे. जर्जर झालेल्या भिंती, उखडलेले प्लास्टर अशी अवस्था या इमारतीची आहे. पावसाळय़ात तर बेसमेंटमध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी साचते.

आचारसंहितेनंतर पुन्हा निविदा काढणार

मुख्यालयाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. अहवालानुसार, या इमारतीची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. त्यानुसार गेल्या वर्षी मार्च महिन्यात 11 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली होती, मात्र या निविदेला थंड प्रतिसाद मिळाला. आचारसंहिता संपल्यानंतर मुख्यालयाच्या डागडुजीसाठी पुन्हा नव्याने निविदा काढली जाईल, अशी माहिती एसआरएच्या वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.