विधी प्रवेश परीक्षेसाठी कैद्याची हायकोर्टात धाव

विधी प्रवेश परीक्षा देण्यासाठी फर्लो रजेवर तुरुंगातून बाहेर येण्यास मुभा द्या, अशी विनंती करीत कैद्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बुधवारी सुट्टीकालीन खंडपीठाने त्याला अंतरिम जामिनासाठी अर्ज करण्यास मुभा दिली. अर्जदार कैदी सोहेल अन्सारी याला हत्येच्या गुह्यात जन्मठेप झाली असून तो नऊ वर्षांपासून तुरुंगात आहे.

अन्सारीविरोधात 2014 मध्ये हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. याप्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयाने त्याला 23 डिसेंबर 2021 रोजी दोषी ठरवून जन्मठेप सुनावली. ही शिक्षा भोगत असतानाच त्याने एलएलबी करण्याचे ठरवले. 2022 मध्ये त्याने विधी प्रवेश परीक्षेसाठी नाशिक तुरुंग अधीक्षकांकडे फर्लो रजेची मागणी केली होती. मात्र 11 मार्च 2023 रोजी त्याचा रजेचा अर्ज फेटाळला. नंतर पुण्यातील वरिष्ठ तुरुंग अधिकारी व तुरुंग महानिरीक्षकांनी अपील फेटाळले. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याच्या याचिकेवर न्यायमूर्ती नितीन बोरकर आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसेन यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या वेळी अन्सारीतर्फे अॅड. इरफान उनवाला, अॅड. प्रशांत पांडे यांनी बाजू मांडली. खंडपीठाने अन्सारीला फर्लोऐवजी अंतरिम जामीन अर्ज करण्यास मुभा दिली. या अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. परीक्षेसाठी मुंबईत ये-जा करण्यास अन्सारीला तुरुंगातून मोकळीक मागितली आहे.