सहाव्या टप्प्यातील प्रचार थांबला; देशातील 57 मतदारसंघांत उद्या मतदान

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील प्रचार गुरुवारी थांबला. या टप्प्यात दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, हरयाणा, जम्मू-कश्मीर, झारखंड आदी सात राज्यांतील 57 मतदारसंघांत शनिवार, 25 मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी सर्वत्र चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. लोकसभेच्या 548 जागांसाठी सात टप्प्यांत मतदान घेण्यात येत आहे. आतापर्यंत मतदानाचे पाच टप्पे पार पडले असून 25 मे रोजी सहाव्या टप्प्याचे मतदान घेण्यात येणार आहे. सहाव्या टप्प्यात सात राज्यांतील 57 मतदारसंघांचा समावेश आहे. आज या मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या. शुक्रवारी मतदान कर्मचाऱयांना मतदानाचे साहित्य वाटप करण्यात येणार असून सायंकाळपर्यंत हे कर्मचारी आपापल्या पेंद्रांवर पोहोचतील. आतापर्यंत झालेल्या पाचही टप्प्यांत उन्हाच्या जबर तडाख्यामुळे मतदानाचा टक्का घसरला. या टप्प्यालाही उन्हाच्या झळा बसण्याची शक्यता आहे.