मुंबई विद्यापीठाची पदवीधर मतदारसंघाची निवडणूक कधी?

मुंबई विद्यापीठाची पदवीधर मतदारसंघाची निवडणूक गेल्या कित्येक दिवसांपासून रेंगाळली आहे. विद्यापीठाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार 21 एप्रिलला पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार होती, पण ही तारीख उलटून महिना उलटला तरी विद्यापीठाकडून निवडणूक घेण्याबाबत कोणतीही हालचाल होताना दिसत नाही

महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक पार पडली आहे. त्यामुळे आता मुंबई विद्यापीठाची नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघाची निवडणूक कधी होणार असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. वर्ष 2022 साठी हि निवडणूक होणार होती मात्र जवळपास दोन वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही ही निवडणूक झालेली नाही. विद्यार्थी व कर्मचायांचे प्रश्न, संलग्नित महाविद्यालयांचे प्रश्न, परीक्षांचा घोळ, निकाल विलंब, कलिना संकुलात विद्यार्थ्यांना दररोज भेडसावणाया समस्या विद्यापीठापर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी च सध्या उपलब्ध नाही.

विद्यापीठ स्वायत्त संस्था, निवडणुक घेण्याचा अधिकार

विद्यापीठ स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे निवडणूक घेण्याचा अधिकार विद्यापीठाला आहे. तरीही लोकसभा निवडणुकीच्या काळात पदवीधरची निवडणूक घेण्याबाबत विद्यापीठाकडून राज्य निवडणूक आयोगाकडे विचारणा करण्यात आली होती. परंतु अद्याप निवडणूक घेण्याबाबत कोणतेही पत्र राज्य निवडणूक आयोगाकडून विद्यापीठाला मिळालेले नाही.

विद्यापीठाने पदवीधर निवडणुकीची प्रक्रिया राबवावी

लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता 4 जून रोजी संपणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाची वाट न पाहता पदवीधर निवडणुकीची उर्वरित प्रक्रिया राबवावी.  निवडणुकीची आचारसंहिता आणि पदवीधर निवडणुकीचा काहीच संबंध नाही, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले.