धूळ खात पडलेली पाच हजार घरे; विकण्यासाठी म्हाडाची शक्कल

विविध कारणांमुळे विरार बोळींज येथील म्हाडाची पाच हजार घरे विक्रीअभावी धूळ खात पडली आहेत. अक्षय्य तृतीयाचे औचित्य साधत या घरांच्या विक्रीसाठी प्राधिकरणातर्फे सोशल मीडियावर विशेष पॅम्पेन राबविण्यात येणार आहे.

कनेक्टिव्हिटी आणि पुरेसे पाणी उपलब्ध नसल्यामुळे आतापर्यंत अनेकदा सोडत काढूनदेखील बोळींजमधील घरांची विक्री झालेली नाही. अलीकडेच सूर्या प्रकल्पाचा पाणीपुरवठा सुरू झाला तरीही अर्जदारांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. याउलट या घरांची सुरक्षितता आणि मेंटेनन्सवर म्हाडाचे लाखो रुपये खर्च होत आहेत. सध्या या घरांची ‘प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर विक्री सुरू असून संपूर्ण पैसे भरल्यास केवळ दोन आठवडय़ांत घराचा ताबा दिला जाणार आहे. अलीकडेच म्हाडा उपाध्यक्षांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत या घरांच्या विक्रीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात आले.

जाहिरातबाजीवर लाखोंची उधळपट्टी

बोळींजमधील घरांच्या विक्रीसाठी गेल्या वर्षी म्हाडातर्फे बस आणि ट्रेनमध्ये जाहिराती, रेडिओवर जिंगल्स याशिवाय जीवदानी मंदिर तसेच रेल्वे स्टेशन परिसरात पॅम्पेन राबविण्यात आले होते. जाहिरातबाजीवर लाखो रुपये खर्च करण्यात आले. तरीही अर्जदारांना आकर्षित करण्यात  यश आले नाही

एकगठ्ठा घर विक्रीकडे लक्ष

बोळींजमधील एकगठ्ठा शंभर किंवा त्यापेक्षा अधिक घरे खरेदी केल्यास प्रत्येक घरावर 15 टक्के सवलत म्हाडा देणार आहे. इच्छुक व्यक्ती किंवा संस्थांना यासाठी पुढे येण्याचे आवाहन प्राधिकरणाने केले होते. आता या योजनेला संस्थांचा कसा प्रतिसाद मिळतोय, याकडे प्राधिकरणाचे लक्ष लागले आहे.