IPL 2024 – सिराजचा तिखट मारा; विराट-फाफची झंझावाती सलामी, बंगळुरुचा 4 विकेट्सने विजय

आयपीएलमधून बाहेर पडलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आता इतर संघांची गणितं बिघडवण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी बंगळुरुतील एम चिन्नास्वामी मैदानात झालेल्या लढतीत बंगळुरूने गुजरात टायटन्स संघाचा 4 विकेट्सने पराभव केला. गुजरातने विजयासाठी दिलेले 148 धावांचे आव्हान बंगळुरूने 6 गड्यांच्या मोबदल्यात आणि 38 चेंडू राखून आरामात पार केले. गुजरातची सलामीची जोडी बाद करणाऱ्या मोहम्मद सिराजला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

गुजरातने दिलेल्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस यांनी बंगळुरूला 92 धावांची सलामी दिली. सहाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर डू प्लेलिस (64) बाद झाला आणि ही जोडी फुटली. त्यानंतर अवघ्या 30 धावांमध्ये बंगळुरूने आणखी 5 विकेट्स गमावल्याने सामना रोमहर्षक झाला. मात्र दिनेश कार्तिक (21) आणि स्वप्निल सिंह (15) यांनी अधिक पडझड न होऊ देता 14व्या षटकात बंगळुरूला विजयी केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या षटकामध्ये वृद्धिमान सहा (1) आणि चौथ्या षटकात कर्णधार शुभमन गिल (2) माघारी परतले. त्यानंतरह साई सुदर्शनही (6) बाद झाल्याने गुजरातची अवस्था 3 बाद 19 अशी बिकट झाली. यानंतर शाहरूख खान आणि डेव्हिड मिलर यांनी अर्धशतकीय भागीदारी करत गुजरातचा डाव सावरला, मात्र एका अप्रतिम थ्रो वर विराटने शाहरूखला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर राहुल तेवतिया याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो बाद झाल्यानंतर गुजरातचा डाव 147 धावांमध्ये आटोपला. बंगळुरूकडून सिराज, यश दयाल, विजयकुमार वैशाख यांनी प्रत्येकी दोन, तर ग्रिन आणि करण शर्माने प्रत्येकी एक विकेट घेतली.