आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत हजारो शिवसैनिकांची दणक्यात रॅली, राजन विचारे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे उद्या सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तिस्थळी नतमस्तक होऊन सकाळी 9 वाजता भव्य रॅलीला सुरुवात होणार आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे व शिवसेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत खारकळ आळी सिद्धिविनायक मंदिर, मार्केट रोड, काँग्रेस ऑफिस, तलावपाळी मार्ग, जांभळी नाका त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानापर्यंत भव्य रॅली काढण्यात येणार आहे.

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजन विचारे यांनी आपल्या प्रचारात बाजी मारली आहे. ठाण्यात निष्ठावान विरुद्ध गद्दार असा सामना रंगणार आहे. देशासह राज्यात ठाणे लोकसभेला महत्त्व प्राप्त झाल्याने महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजन विचारे यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्धार केला आहे. शिवसेना पक्षाचे एकनिष्ठ राजन विचारे यंदा हॅट्रिक करणारा असून लोकसभा उमेदवारीचा अर्ज दाखल करण्याकरिता हजारोंच्या संख्येने निष्ठावंत शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अर्ज दाखल करण्यासाठी बनवण्यात आलेल्या व्हिडीओला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत आहे.