‘चांद्रयानासोबत गेलेल्या सर्व प्रवाशांना सलाम’, राजस्थानच्या क्रीडामंत्र्यांचं अज्ञान; नेटकऱ्यांनी टोचले कान

हिंदुस्थानची चांद्रयान मोहिम यशस्वी झाली असून चंद्रावर तिरंगा फडकला आहे. बुधवारी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी विक्रम हे लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले आणि अवघ्या देशाने चंद्रोत्सव साजरा केला. देश, विदेशातील नावाजलेल्या लोकांनी, राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देताना ‘इस्त्रो’च्या शास्त्रज्ञांचे, हिंदुस्थानचे अभिनंदन केले. मात्र या ऐतिहासिक दिनी राजस्थानचे क्रीडामंत्री अशोक चंदना (Ashok Chandna) आपल्या अज्ञानामुळे ट्रोल झाले असून त्यांची चांगलीच फजिती झाली.

‘इस्त्रो’ची महत्त्वाकांक्षी ‘मिशन चंद्र’ ‘चांद्रयान-3’चे लँडर मॉड्यूल चंद्रावर उतरले. याबाबत राजस्थानचे क्रीडामंत्री अशोक चंदना यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ‘आपण यशस्वी झालो आणि सुरक्षित लँडिंग केले. चांद्रयानासोबत चंद्रावर गेलेल्या प्रवाशांना मी सलाम करतो. आपल्या देशाने विज्ञान आणि अवकाश संशोधनात आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे, त्याबद्दल मी सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो’, असे अशोक चंदना म्हणाले.

दरम्यान, ‘इस्त्रो’च्या चांद्रयान-3 मोहिमेबद्दल देशभरातील लोकांना माहिती आहे. माध्यमामधून या मोहिमेची सतत चर्चा सुरू होती. या मोहिमेचा फायदा काय, लँडर चंद्रावर कधी आणि कोणत्या भागात उतरणाची याचीही माहिती इस्त्रोने वारंवार दिली होती. चांद्रयान-3 ही मानवविरहित मोहीम होती. चांद्रयानासोबत विक्रम लँडर आणि एक रोव्हर चंद्रापर्यंत पोहोचणार होते आणि प्रत्यक्षातही झाले तसेच. चांद्रयान-3 मोहिमेत प्रत्यक्षात चंद्रावर कोणीही माणूस जाणार नसल्याचे साऱ्या जगाला माहिती होते. असे असतानाही राजस्थानच्या क्रीडामंत्र्यांनी याबाबचे अज्ञात प्रकट केल्याने नेटकऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवली.

चांद्रयान-3 मोहिम

6 जुलै – इस्रोने चांद्रयान-3 मिशन लाँच करणार असल्याची माहिती दिली. 14 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथून चांद्रयान अंतराळात पाठवले जाईल असे जाहीर केले.

7 जुलै – लाँच पॅडचं निरीक्षण.

14 जुलै – चांद्रयान-3 मोहिमेचे श्रीहरिकोटा येथून दुपारी 2.35 वाजता जीएसएलव्ही मार्क 3 (एलव्हीएम 3) हेवी-लिफ्ट लाँच व्हीकलद्वारे यशस्वी प्रक्षेपण.

1 ऑगस्ट – चांद्रयान चंद्राच्या कक्षेजवळ पोहोचलं. या दिवसापासून चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करून लँडिंगच्या तयारीला सुरुवात.

5 ऑगस्ट – चांद्रयान 3 चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश.

6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट – चांद्रयानाने चंद्राची प्रदक्षिणा सुरू केली. तसेच चंद्राच्या पृष्ठभागाकडे प्रवास सुरू केला.

17 ऑगस्ट – चांद्रयान मिशनमध्ये महत्त्वाचा असलेला लँडर प्रोपल्शन मॉडय़ूलपासून यशस्वीरीत्या वेगळा करण्यात आला. यानंतर चंद्राच्या दिशेने लँडरचा प्रवास सुरू झाला.

20 ऑगस्ट – लँडिंगच्या प्रक्रियेला सुरुवात.

23 ऑगस्ट – चांद्रयान 3 यशस्वीपणे चंद्रावर उतरलं.


पुढे काय…

धूल सेटल झाल्यानंतर विक्रम लँडर सुरू होईल आणि संवाद करेल.

पुन्हा रँप उघडेल. प्रज्ञान रोवर रँपहून चंद्राच्या पृष्ठभागावर येईल.

चंद्राच्या मातीत अशोक स्तंभ आणि इस्रोच्या लोगोची छाप सोडेल.

विक्रम लँडर प्रज्ञानचा फोटो आणि प्रज्ञान विक्रम विक्रम लँडरचा फोटो काढेल. हे फोटो पृथ्वीवर पाठवले जातील.