रणजीच्या रणांगणात स्टार फलंदाजांची दांडी गुल, यशस्वीचा भोपळा तर राहुल, सरफराजही अपयशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीचा दरारा निर्माण करणाऱया स्टार फलंदाजांना रणजी करंडकाच्या पहिल्याच दिवशी लाल चेंडूच्या क्रिकेटने चांगलाच घाम फोडला. हिंदुस्थानी संघातील आघाडीचे फलंदाज यशस्वी जैसवाल, के. एल. राहुल आणि सरफराज खान यांना मोठी खेळी करण्यात अपयश आल्याने देशांतर्गत क्रिकेटच्या रणांगणात अनुभवापेक्षा त्या दिवसाचा खेळ महत्त्वाचा ठरतो, याची पुन्हा प्रचीती आला

मुंबईकडून खेळणाऱया यशस्वी जैसवालला चंदिगडविरुद्ध खातेही उघडता आले नाही. आपल्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडेवर खेळत असलेल्या या सामन्यात अवघ्या 13 चेंडूंचा सामना करून तो शून्यावर बाद झाला. मुंबईच्या डावाला भक्कम सुरुवात करून देण्याची जबाबदारी असलेल्या जैसवालच्या या अपयशाने संघाच्या फलंदाजीला सुरुवातीलाच धक्का बसला. त्यातच सरफराज खानलाही मोठी खेळी करता आली नाही. तो सहा चेंडूंत केवळ एक धाव करून माघारी परतला. आक्रमक फलंदाजी आणि मोठय़ा धावसंख्यांसाठी ओळखल्या जाणाऱया या दोघांकडून अपेक्षा उंचावल्या असताना चंदिगडच्या गोलंदाजांनी त्यांना रोखण्यात यश मिळवले.

दुसरीकडे, आंध्रविरुद्ध उतरलेल्या कर्नाटकच्या के. एल. राहुललाही केवळ चार धावाच करता आल्या. कावुरी साई तेजा आणि के. व्ही. सशिकांत यांनी सुरुवातीच्या षटकांत अचूक मारा करत कर्नाटकच्या फलंदाजांना अडचणीत आणले. उपविजेत्या कर्नाटकसाठी हा सुरुवातीचा धक्का ठरला.

सिद्धेश लाडने किल्ला लढवला

वानखेडे स्टेडियमवर चंदिगडविरुद्ध मुंबईने पहिल्या दिवसअखेर 84 षटकांत 5 बाद 249 धावा केल्या. यशस्वी जैसवालला खातेही उघडता आले नाही, तर सरफराज खान केवळ एक धाव करून बाद झाला. आयुष म्हात्रेने 48 धावांची खेळी केली, तर मुशीर खानने 65 धावा करत डावाला आकार दिला. कर्णधार सिद्धेश लाडने संयमी फलंदाजी करत नाबाद 80 धावा केल्या. त्याने शम्स मुलानीसह (ना. 27) 65 धावांची अभेद्य भागी रचत संघाला अडीचशेपर्यंत नेले. चंदिगडकडून रोहित धांडाने तीन विकेट घेत मुंबईच्या फलंदाजांना रोखले.

जेकेच्या रोहित शर्माचा पंच

 गतविजेत्या जम्मू-कश्मीरने (जेके) श्रीनगरमध्ये मध्य प्रदेशला पहिल्या डावात 196 धावांत गुंडाळत दणक्यात सुरुवात केली. मध्यमगती गोलंदाज रोहित शर्माने 36 धावांत पाच विकेट घेत मध्य प्रदेशच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. डावखुरा वेगवान गोलंदाज सुनील कुमारनेही 69 धावांत चार विकेट टिपत रोहितला साथ दिली. मध्य प्रदेशचा कर्णधार शुभम शर्माने 174 चेंडूंत 79 धावांची झुंजार खेळी केली; मात्र अन्य फलंदाजांना मोठी भागीदारी उभारता आली नाही.