काळजीवाहू पंतप्रधान नेमा! निर्वाणीचा इशारा दिल्याने राष्ट्रपतींवर पाकिस्तानी पंतप्रधानांची आगपाखड

काळजीवाहू पंतप्रधानांच्या नियुक्तीवरून पाकिस्तानात कलह निर्माण झाला आहे. काळजीवाहू पंतप्रधानांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्याचा आज म्हणजेच शनिवार हा शेवटचा दिवस आहे. पंतप्रधान शहबाज शरीफ आणि पाकिस्तानी संसदेतील विरोधी पक्षनेते राजा रियाझ यांच्याकडून पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी काळजीवाहू पंतप्रधानपदासाठी नावे मागितली आहेत. ही नावे पाठवण्यासाठी पाकिस्तानी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी दोन्ही नेत्यांना पत्र लिहून निर्वाणीचा इशारा दिला आहे.

पाकिस्तानी संसद विसर्जित करून पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. दरम्यानच्या काळात पाकिस्तानच्या राजकारणात उलथापालथ पाहायला मिळत आहे. राष्ट्रपती आरिफ अल्वी आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यातील मतभेद शुक्रवारी पुन्हा एकदा उघड झाले . राष्ट्रपती अल्वी यांनी शाहबाज शरीफ यांना पत्र लिहून शनिवारपर्यंत (आज) काळजीवाहू पंतप्रधान नियुक्त करण्याचा इशारा दिला आहे. राष्ट्रपतींच्या या पत्राने पंतप्रधान शाहबाज वैतागले आहेत. त्यांनी राष्ट्रपतींना प्रश्न विचारला आहे की विचारले की इतकी घाई कशासाठी ? राष्ट्रपतींनी संविधान वाचले नसावे असे म्हणज शहबाज यांनी अल्वी यांच्यावर टीका केली आहे.

काळजीवाहू पंतप्रधानांच्या नावावर शनिवारपर्यंत निर्णय होईल, असे शाहबाज शरीफ यांचे म्हणणे आहे. शरीफ म्हणाले की, राष्ट्रपतींनी त्यांना आणि विरोधी पक्षाचे नेते (राजा रियाझ) यांना 12 ऑगस्टपर्यंत काळजीवाहू पंतप्रधानासाठी नाव सुचविण्याचा प्रस्ताव दिला आहे . शरीफ म्हणाले की, ते आणि राजा रियाझ शनिवारपर्यंत नाव निश्चित करतील. आघाडीतील पक्षांच्या नेत्यांशीही चर्चा केली जाणार असून अंतिम निर्णयाबाबत आघाडीतील सगळ्या नेत्यांना विश्वासात घेतले जाईल, असे ते म्हणाले .

शरीफ म्हणाले की, पाकिस्तानी संसद विसर्जित केल्यानंतर काळजीवाहू पंतप्रधानांच्या नियुक्तीसाठी घटनेत आठ दिवसांची तरतूद आहे. घटनेनुसार , काळजीवाहू पंतप्रधानांच्या नावावर निर्णय घेण्यासाठी पंतप्रधान आणि नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेत्याला तीन दिवसांचा कालावधी असतो. दोघांमध्ये नावावर एकमत होत नसेल, तर प्रकरण संसदीय समितीकडे पाठवले जाते. समिती निर्णय घेण्यास अपयशी ठरल्यास , पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाकडे ( ईपीसी) पाठवलेल्या नावांच्या यादीतून काळजीवाहू पंतप्रधान निवडला जातो त्यासाठीही 2 दिवसांचा अवधी असतो.

राष्ट्रपतींनी पत्र लिहिले

पाकिस्तानी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेत्यांना काळजीवाहू पंतप्रधान नेमण्याची आठवण करून दिली होती. कलम 224A अंतर्गत त्यांना संसद विसर्जित झाल्यानंतर तीन दिवसांच्या आत काळजीवाहू पंतप्रधानांसाठी नाव सुचवायचे असते असे राष्ट्रपतींनी त्यांच्या पत्रात म्हटले होते.

पाकिस्तान पीपल्स पार्टीने माजी राजदूत जलील अब्बास जिलानी आणि पाकिस्तानचे माजी सरन्यायाधीश तस्दुक हुसैन जिलानी यांच्या नावांचा प्रस्ताव दिला आहे. तर मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट-पाकिस्तानने (MQM-P) सिंधचे राज्यपाल कामरान टेसोरी यांचे नाव पुढे केले आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (PML-N) ने आपले पत्ते अद्याप उघड केले नाही. डॉन वृत्तपत्राच्या वृत्तानुसार , काळजीवाहू पंतप्रधानाचे नाव देण्यास उशीर होण्याचे एक कारण म्हणजे पीएमएल-एनच्या रणनीतीचा भाग आहे. शरीफ कुटुंबाला त्यांच्या मर्जीतील माणूस काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नेमायचा आहे.

दिरंगाईमागे शरीफ कुटुंबाची रणनिती
राजकीय वर्तुळातील लोकांचे असे मत आहे की पंतप्रधान शरीफ यांना 14 ऑगस्टपर्यंत पदावर राहायचे आहे, जेणेकरून ते स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण समारंभाला उपस्थित राहू शकतील. त्यानंतर काळजीवाहू पंतप्रधान शपथ घेऊ शकतात. पीएमएल-एनच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, सिनेटचे अध्यक्ष सादिक संजरानी हे प्रबळ उमेदवारांपैकी एक आहेत. त्यांनी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्याही नावाचा उल्लेख केला आहे. काळजीवाहू पंतप्रधान पदासाठीच्या संभाव्य उमेदवारांमध्ये जिलाल अब्बास जिलानी , माजी अर्थमंत्री हाफीज शेख आणि इशाक दार , माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी , माजी प्रधान सचिव फवाद हसन फवाद , माजी न्यायाधीश तस्दुक जिलानी , अब्दुल्ला हुसैन हारून , पीर पगारो आणि मखदूम महमूद अहमद यांचा समावेश आहे.