रोखठोक – फसवाफसवीचे नवे बुद्धिबळ, हिंदुत्व कोणी शिकवायचे?

महाराष्ट्रासह संपूर्ण देश फसवाफसवीच्या बुद्धिबळात अडकून पडला आहे. रिझर्व्ह बँकेसह सर्व राष्ट्रीय यंत्रणांवर एका गटाचा कब्जा आहे. रिझर्व्ह बँकेने भाजपच्या मर्जीतील पन्नास कर्जबुडव्यांची हजारो कोटींची कर्जे माफ केली, पण एका नितीन देसाईने कर्ज फेडता येत नाही म्हणून आत्महत्या केली. लोकसभा निवडणुकीत हिंदुत्व, लव्ह जिहादसारखे विषय येतील, पण हिंदुत्व शिकवणारी आजची घराणी मोगलांची मांडलिक होती. आज ही सर्व घराणी भाजपात आहेत.

भारतीय जनता पक्षाचे एक खासदार व अभिनेते सनी देओल यांनी बँकांचे 56 कोटींचे कर्ज थकवले. त्यामुळे त्यांच्या जुहू येथील बंगल्याचा लिलाव पुकारण्यात आला, पण बँकेने पुढच्या चोवीस तासांत तांत्रिक कारण देत लिलाव रद्द केला. त्याआधी पंधरा दिवसांपूर्वी कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना आत्महत्या करावी लागली. बँकांचे कर्ज डोक्यावर असल्याने त्यांच्या ‘एनडी’ स्टुडिओवर जप्तीची कारवाई सुरू झाली. त्या धक्क्यातून देसाई यांना आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागला. कर्ज बुडवणाऱ्यांना अभय दिले जाते, पण ते भारतीय जनता पक्षाच्या आतल्या गोटातील असतील तर. नितीन देसाईंचे प्राणही वाचवता आले असते. श्री. राहुल गांधी हे सरकारच्या आर्थिक घोटाळ्यांवर मोदी सरकारला प्रश्न विचारतात तेव्हा सरकार निरुत्तर होत असते. गांधी यांनी लोकसभेत 2020 साली देशातील 50 प्रमुख ‘विलफुल डिफाल्टर्स’ म्हणजे कर्ज बुडव्यांबाबत प्रश्न विचारले, पण सरकारने उत्तर देण्यास नकार दिला.

त्यानंतर श्री. साकेत गोखले यांनी माहितीच्या अधिकारात रिझर्व्ह बँकेकडून कर्जबुडव्यांचा तपशील मागितला. त्यानुसार 50 कंपन्या व व्यक्तींची यादी देण्यात आली. जैन इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीला 1073 कोटींची कर्जमाफी देण्यात आली. शिवाय इतर 50 कंपन्यांनाही हजारो कोटींची कर्जे माफ केली. एकेका कंपनीचे किमान 500 कोटींचे कर्ज माफ करून जणू मलिदाच वाटला. या सर्व कंपन्या व त्यांचे मालक, भागीदार हे भाजपच्या नात्यागोत्यातील आहेत, पण नितीन देसाई यांना शंभर-सव्वाशे कोटींसाठी आत्महत्या करावी लागली. मराठी माणसाने हे विसरता कामा नये.

बेकायदेशीर धाडी!

सध्या आपल्या देशात फसवाफसवीचे जोरदार बुद्धिबळ सुरू आहे. भारतीय जनता पक्षाच्या ’वाशिंग मशीन’वर बोलायचे तरी किती, असा प्रश्न आता पडला आहे. लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तशा केंद्रीय तपास यंत्रणा अधिक आक्रमक व हिंसक बनताना दिसत आहेत. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने समन्स पाठवले आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या निकटवर्तीयांवर तपास यंत्रणांनी धाडी टाकल्या आहेत. ममता बानर्जी यांचे खासदार भाचे अभिषेक बानर्जी यांच्या जवळच्या लोकांवर नव्याने धाडी पडल्या, तरी यापैकी कोणीही भाजपला शरण जायला तयार नाही. अशा शरणागतीचे प्रकार फक्त महाराष्ट्रात झाले. दिल्लीपुढे न झुकणाऱ्या महाराष्ट्राला हे लांच्छन काही लोकांनी लावले. या मराठी नेत्यांच्या मदतीने आता महाराष्ट्र लुटला जात आहे. ईडी, इन्कम टाक्सचे लोक सत्तेचा कसा गैरवापर करीत आहेत ते छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सांगितले. छत्तीसगडमधून भारतीय जनता पक्ष बघेल यांनी हद्दपार केला. आता भाजपच्या जागी त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाने ‘ईडी’ आणि ‘इन्कम टाक्स’वाल्यांना उतरवले आहे, असे श्री. बघेल म्हणतात. उत्तर प्रदेशात खाण माफियांनी हैदोस घातला आहे. बेकायदेशीरपणे सर्व चालले आहे, पण झारखंडमधील ‘खाण’ व्यवहाराची चौकशी करण्यासाठी ईडी तेथे घुसली आहे. ‘ईडी’चे संचालक संजय मिश्रा हे कर्तव्यकठोर खरेच असतील तर त्यांनी भाजप वाशिंग मशीनमधून आलेल्या सर्व ‘ईडी’वीरांच्या कारवाईस चालना द्यायला हवी. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सर्मा, महाराष्ट्रात अजित पवार, हसन मुश्रीफ, भावना गवळीपासून असे अनेक आहेत, ज्यांच्यावरील कारवाया ‘ईडी’ने भाजपच्या प्रवेशानंतर थांबवल्या. केंद्रीय तपास यंत्रणांचे हे बेकायदेशीर कृत्य आहे. एका रात्रीत हे लोक ‘हिंदुत्ववादी’ आणि मोदीभक्त झाले व त्यांच्यावरील कारवाया थांबवल्या.

मोगलांचा मित्रपरिवार

भाजप वाशिंग मशीनमधून भ्रष्टाचाराचे डाग स्वच्छ करून मिळतात तसे हिंदुत्वाच्या बाबतीतही घडत आहे. अजित पवारांसारखे लोक एका रात्रीत हिंदुत्ववादी झाले. शिंदेंचे चाळीस व पवारांबरोबरचे आमदार-खासदार हे उद्या संघ शाखांवर जाऊन कसरती करताना दिसतील व वैचारिक परिवर्तन घडत आहे असे जाहीर करतील. हिंदुत्वावर घाव घालणारे सर्व लोक भाजपात आले  तसे ज्यांचे पूर्वज व घराणी मोगलांच्या चाकरीत धन्यता मानत होती त्यांचे आजचे वंशज भाजपच्या पखाली वाहताना दिसत आहेत. यापैकी अनेकांना भाजपने खासदार, आमदार म्हणून निवडून आणले. ‘लव्ह जिहाद’ हा लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचाराचा मुद्दा असेल, पण भाजपात आज असे अनेक लोक आहेत ज्यांच्या पूर्वजांनी मोगलांना आपल्या लेकीबाळी दिल्या. भारतीय जनता पक्षाने नुसता खिसा साफ केला तरी असे शंभरावर बाटगे मोगल पडतील. जयपूर राजघराण्याचे लोक भाजपमध्ये आहेत. त्यांनीच एकदा ताज महालावर हक्क सांगितला होता. दिव्या कुमारीच्या घराण्याने सगळ्यात आधी राजस्थानमध्ये मोगलांचे मांडलिकत्व स्वीकारले होते. बादशहा अकबराशी भारमल राजाने आपली मुलगी हरखाबाई हिचा विवाह करून दिला. त्यानंतर भारमलच्या मुलाने आपली मुलगी मानबाई हिचा विवाह शहजादा सलीमशी करून दिला. हलदी घाटात महाराणा प्रताप यांचा पराभव ज्याच्या नेतृत्वाखाली मोगलांनी केला तो मानसिंह हा त्यांचा पूर्वज. छत्रपती शिवाजी महाराजांवर चालून आलेला व शिवरायांचे सर्व किल्ले ‘तहात’ संधी साधून ताब्यात घेणारा मिर्जा राजे जयसिंग याच घराण्यातला. या सगळय़ांनी परक्या मोगल साम्राज्यासाठी आयुष्य वेचले. औरंगजेबाने आग्य्रात शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवले तेव्हा ज्या रामसिंहला महाराजांसोबत ठेवले होते तो रामसिंहदेखील याच घराण्यातला. 1818 मध्ये इंग्रजांची मदत घेऊन मराठय़ांशी लढणारा जगतसिंहदेखील याच घराण्यातला. हे सर्व आधी मोगलांचे व नंतर ब्रिटिशांचे मांडलिक झाले. हा इतिहास असला तरी ही सर्व घराणी आज भाजपबरोबर आहेत व ते महाराष्ट्राला हिंदुत्व वगैरे शिकवत आहेत. पुन्हा ‘लव्ह जिहाद’ वगैरे विषय जोडीला आहेतच. महुआ मोईत्रा या तृणमूल काँग्रेसच्या खासदार. संसदेत त्या जोरदार भाषण करतात. त्यांचे भाषण ऐकून मोदींसह संपूर्ण भाजपचा रक्तदाब वाढतो. त्यांनी सांगितले, “2024 च्या निवडणुका जिंकण्यासाठी देशभरात दंगे घडवले जातील. अयोध्येत राममंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात देशभरातून विशेष ट्रेन सोडल्या जातील व त्यातील ट्रेनवर मुस्लिमांच्या गावांतून हल्ले घडवले जातील. त्यांना पुन्हा ‘गोध्रा’ करायचे आहे.” महुआ मोईत्रा यांनी जे सांगितले ते गंभीरच आहे.

एका गटाचा ताबा

देश चालविणाऱ्या सर्व यंत्रणांवर आज एका गटाचा ताबा आहे. सर्वोच्च न्यायालय दबावाखाली आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांची देश वाचविण्याची झुंज एकाकी आहे. लोकांच्या मनात प्रचंड खदखद व संताप आहे. सरकार निवडणुका घेत नाही व ‘ईव्हीएम’, निवडणूक आयोगावरही लोकांचा विश्वास राहिलेला नाही. रिझर्व्ह बँकेला वेठीस धरून आपापल्या लोकांची हजारो कोटींची कर्जे माफ करायची व एखादा मराठी नितीन देसाई आत्महत्येस प्रवृत्त करायचा. हे सर्व सुरूच आहे. चंद्रावर भारताचे यान उतरले ते सर्व फक्त पंतप्रधान मोदींमुळेच साध्य झाले अशा थाटात भाजपचे लोक वावरत आहेत. ब्राझिलमध्ये सध्या अशाच पद्धतीचा कारभार चालला आहे. त्यास कंटाळून लोक शेवटी रस्त्यावर उतरले. ब्राझिलची राजधानी रियो डी जिनेरियोमध्ये रस्ते, जनजीवन ठप्प झाले. लोकांनी सुप्रीम कोर्ट, राष्ट्रपती भवन, संसदेवर हल्ला केला. लोक का भडकले? तर सार्वत्रिक निवडणुकीचे जे निकाल लागले ते जनतेला मान्य नव्हते. हे निकाल खरे नाहीत व त्यात गोलमाल आहे. या चिडीतून लोकांनी बंड केले. ते शेवटी मोडून काढले, पण लोकांना रोखणे कठीण गेले. सहनशीलतेचा अंत झाला की दुसरे काय होणार?

लोकांचे प्रश्न तसेच आहेत. तपास यंत्रणांची हुकूमशाही वाढतच आहे. या सगळ्यावर उतारा म्हणून ‘चांद्रयान’ चंद्रावर उतरले. आता सर्व प्रश्न सुटतील. पंतप्रधान मोदींनी हे किती अचाट काम केले!

Twitter – @rautsanjay61
Email –  [email protected]