खंडोबाच्या जेजुरीत भेसळयुक्त भंडाऱ्याची विक्री, विक्रेत्यांवर कारवाईची मागणी

साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीनगरीत भेसळयुक्त भंडाऱ्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. हा भेसळयुक्त भंडारा उधळणीमुळे अनेक भाविकांना डोळ्यांची, अंगाची आग होणे, डोके दुखणे, चक्कर येणे, त्वचेला खाज सुटणे आदी त्रास होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भेसळयुक्त भंडाऱ्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या सर्व प्रकारामध्ये अन्न व औषध भेसळ प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, जेजुरीतील भेसळयुक्त भंडारा विक्रेत्यांवर कारवाई होण्याची गरज आहे.

खंडोबाला हळकुंडापासून बनवलेली हळद वाहण्याची प्रथा पूर्वीपासून आहे. त्यामुळे येथील स्थानिक व्यापारी हळकुंडापासून बनवलेली हळदच विकतात; परंतु आता चांगली बाजारपेठ उपलब्ध झाल्याने राज्याच्या काही भागांत ‘यलो पावडर’ नावाने बनावट भंडारा बनवण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यातील बहुतांश माल जेजुरीत विकला जातो. अतिशय कमी किमतीत यलो पावडरच्या बॅगा मिळत असल्याने त्यात दुप्पट नफा मिळतो. त्यामुळे देवधर्माच्या नावाखाली त्याची विक्री मोठ्या प्रमाणात होते.

कोरोना काळात राज्यातील सर्वच मंदिरे बंद होती. ऑक्टोबर महिन्यात प्रशासनाने नियम शिथिल करत मंदिरे सुरू केली. त्यामुळे जेजुरीनगरीतही भाविकांची संख्या लक्षणीय वाढली आहे. वाढलेली भाविकांची गर्दी पाहता पुन्हा भेसळयुक्त भंडारा विक्रीचे प्रमाणही लक्षणीय वाढले आहे तसेच मधल्या टाळेबंदी काळातील राहिलेला व प्रतवारी संपलेला भंडारा विक्री होत आहे.

येथे वर्षाकाठी सात ते आठ मोठ्या यात्रा होतात. खंडोबाला वाहण्यासाठी कापडी पिशवीत भंडारा व खोबरे एकत्र देण्याची प्रथा आहे. यातील खोबरे भाविक प्रसाद म्हणू खातात. या खोबऱ्याला लागलेली यलो पावडर पोटात जात असल्याने भाविकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात. जेजुरी नगरपालिका, खंडोबा देवस्थान व पोलीस स्टेशन यांनी या गंभीर प्रश्नात लक्ष घालून बनावट भंडाऱ्यावर कायमची बंदी घालावी, अशी मागणी जेजुरीत होत आहे.