गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या कामात जलवाहिन्यांचे स्थलांतर

पश्चिम आणि पूर्व उपनगरातील वाहतूककोंडी फोडण्यामध्ये महत्त्वपूर्ण ठरणाऱया गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पात जलवाहिन्यांचे स्थलांतर करावे लागणार आहे. या कामासाठी पालिकेला 45 कोटींचा खर्च करावा लागणार आहे.

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडअंतर्गत रत्नागिरी हॉटेल चौक, गोरेगाव येथे प्रस्तावित सहा पदरी उड्डाणपूल, मुलुंड खिंडीपाडा येथे उच्चस्तरीय चक्रीय उन्नत मार्ग आणि डॉ. हेडगेवार चौक, मुलुंड येथे सहा पदरी उड्डाणपूल बांधण्यासाठी पालिकेच्या वतीने बांधकामाच्या आराखडय़ासह बांधकाम करण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली. या कामांसाठी एस. पी. सिंगला कन्स्ट्रक्शन कंपनीची निवड करून या कंपनीला 29 जानेवारी 2022 रोजी कार्यादेश देण्यात आला. हे काम कार्यादेश दिल्यापासून 36 महिन्यांमध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. या कामासाठी 666 कोटी रुपयांच्या खर्च करण्यास मान्यता मिळाली होती, परंतु आता खर्च सुमारे 45 कोटी रुपयांनी वाढून हे कंत्राट काम 713.18 कोटी रुपये एवढे होणार आहे.

असा वाढला खर्च
या प्रकल्प रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी प्रत्यक्षात सर्वेक्षण आणि खोदकाम हाती घेतल्यानंतर वेगवेगळय़ा व्यासाच्या भूमिगत पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्या व मलनिस्सारण वाहिन्या जात असल्याचे निदर्शनास आल्याचे पालिकेच्या संबंधित विभागातील अधिकाऱयाने सांगितले.

या प्रकल्पाच्या अंतर्गत भूमिगत सेवा वळवण्यासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद प्रकल्प खर्चामध्ये करण्यात आली होती, परंतु आता सर्वेक्षण आणि खोदकामानंतर आढळून आलेल्या भूमिगत सेवांचे जाळे वळवण्यासाठी 25.68 कोटी रुपये अधिकचा खर्च येणार आहे. त्यामुळे हा एकूण खर्च 45.68 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.