नववर्षाची सुरुवात बाप्पाच्या आशीर्वादाने; श्री सिद्धिविनायक मंदिर उद्या सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत राहणार खुले

नववर्षाची सुरुवात बाप्पाच्या आशीर्वादाने करण्यासाठी असंख्य भाविक दरवर्षी नववर्षाच्या पहिल्या दिवशी प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री सिद्धिविनायक मंदिर उद्या, 1 जानेवारी रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत श्रींच्या दर्शनासाठी खुले राहणार आहे. भाविकांना क्यूआर कोडद्वारे मर्यादित संख्येमध्ये दर्शनाची व्यवस्था केली आहे, अशी माहिती श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या वतीने देण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी येणाऱया भाविकांच्या शरीराचे तापमान, मास्क आदी गोष्टी तपासून तसेच क्यूआर कोड स्कॅनिंग करून मगच भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाईल. रिद्धी व सिद्धी चेकपोस्ट येथून श्रींच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी कोरोनाच्या नियमावलीचे पालन करून श्रींचे दर्शन रांगेतून घ्यावे. कोरोनाच्या नियमावलीचे पालन करून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या वतीने करण्यात आले आहे.