थर्टी फर्स्ट’साठी दोन लाख मद्यपींनी घेतला परवाना, गावागावांत पोलीस पाटलांचा ‘वॉच’

नववर्षाच्या स्वागताची तयारी आता सुरू असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माध्यमातून एक लाख देशी व सव्वा दोन लाख विदेशी दारूचे एकदिवसीय परवाने वितरित झाले आहेत. हॉटेल, धाबे किंवा अन्य कोठेही विनापरवाना मद्यपान किंवा मद्यविक्री करू नये, नियमांचे उल्लंघन करून नववर्षाचे स्वागत करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी ग्रामीण व शहर पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण 15 पेक्षा अधिक पथके नेमली आहेत.

कोरोनाच्या संकटानंतर पहिल्यांदाच नववर्षाचे स्वागत धूमधडाक्यात होणार आहे. त्यादिवशी हॉटेल, धाबे, रेस्टॉरंटवर ग्राहकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे 31 डिसेंबर रोजी बार व रेस्टॉरंट पहाटे एक ते पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण, हॉटेल किंवा धाब्यांवर नवीन वर्षाची पार्टी करायची असल्यास 20 हजारांचे शुल्क भरून त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून वन डे क्लब लायसन्स घेणे बंधनकारक आहे.

विनापरवाना पार्टी केल्यास पार्टीतील सहभागी व्यक्तींसह हॉटेलमालकाविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो. मद्यपान करणाऱ्यांना दोन ते पाच हजारांचा दंड, तर हॉटेलमालकास 25 हजार रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. 31 डिसेंबरला मोठय़ा प्रमाणावर मद्यविक्री होते. या पार्श्वभूमीवर हातभट्टी दारूनिर्मितीचे तांडे, वाहनांमधून अवैधरित्या वाहतूक होणाऱ्या विदेशी, देशी दारू केली जाते. त्यावर विशेष करून राज्य उत्पादन शुल्क विभागाचा वॉच असणार आहे.

हॉटेल्सला एक दिवसाच्या पार्टीसाठी 20 हजार रुपये, तर व्यक्तींनी एक वर्षासाठी 100 रुपये, आजीवन परवान्यासाठी एक हजाराचे शुल्क भरून परवाना घ्यावा. विनापरवाना तसे प्रकार आढळल्यास 18002339999 क 8422001133 या टोल फ्री क्रमांकावर कोणीही तक्रार करू शकतो, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिली.

जिल्ह्यातील पोलीस पाटलांनी 31 डिसेंबर रोजी त्यांच्या हद्दीतील अवैध व्यवसायांवर लक्ष ठेवावे. सतत पोलिसांच्या संपर्कात राहावे. विनापरवाना मद्यविक्री, कुठे भांडण-तंटे झाल्यास व अवैध दारू वाहतूक होत असल्यास त्याची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी, अशा सूचना पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी केल्या आहेत. मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे.

फटाके उडविण्यास दोनच तास परवानगी

नववर्षाच्या स्वागतावेळी रात्री दहा ते 12 या वेळेतच फटाके उडविण्यास परवानगी राहील. मद्यपान करून कोणीही वाहन चालवू नये. त्यांच्या तपासणीसाठी 40 ब्रिथ ऍनालायझर मशीन पोलिसांना दिल्या आहेत. सात पोलीस ठाण्यांतर्गत ठिकठिकाणी नाकाबंदी असेल. अवैध व्यवसायांवर गुन्हे शाखेचा वॉच असल्याची माहिती सोलापूर शहर पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी दिली.

ड्रंक ऍण्ड ड्राइव्हच्या कारवाईवर भर

31 डिसेंबर रोजी पहाटेपर्यंत 25 पोलीस ठाण्याअंतर्गत नाकाबंदी राहील. ड्रंक ऍण्ड ड्राइव्हच्या कारकाईकर भर दिला जाईल. 25 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील पोलिसांना 35 ब्रिथ ऍनालायझर मशीन दिल्या आहेत. मद्यपान करून कोणीही वाहन चालवू नये. नियमांचे पालन करून सर्वांनी नववर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले.