टॉस हरताच पाकिस्तान बाद, इंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र

न्यूझीलंडने श्रीलंकेवर एकतर्फी विजय मिळविला तेव्हाच पाकिस्तानचे उपांत्य फेरीच उद्ध्वस्त झाले होते. मात्र तरीही अंधुक आशेसह जगणाऱया पाकिस्तानचे आव्हान इंग्लंडविरुद्ध टॉस हरताच संपले होते आणि इंग्लंडच्या 338 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव 244 धावांतच आटोपला. इंग्लंडने 93 धावांनी विजय मिळवित चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपले नाव निश्चित केले आहे. आता आठवा संघ म्हणून बांगलादेशचेही स्थान निश्चित झाले आहे.

पाकिस्तानसमोर उपांत्य फेरी प्रवेशासाठी इंग्लंडचा 287 धावांनी पराभव करावा किंवा त्यांच्यावर 284 चेंडू राखून विजय नोंदवावा असे अफाट आव्हान होते. तरीही पाकिस्तान विजयासाठी प्रयत्न करणार असे म्हणत होता, पण इंग्लंडने टॉस जिंकताच पाकिस्तानच्या आव्हानातली हवा निघून गेली. इंग्लंडने जॉनी बेअरस्टॉ (59), ज्यो रुट (60) आणि बेन स्टोक्सच्या (84) आक्रमक खेळींमुळे 9 बाद 337 अशी जबरदस्त धावसंख्या उभारली. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या सलामीवीरांना डेव्हिड विलीने सलग षटकात बाद करत 2 बाद 10 अशी अवस्था केली. त्यानंतर खचलेल्या पाकिस्तानचा कुणीच इंग्लिश आक्रमणाला तोंड देऊ शकला नाही. त्यामुळे पाकिस्तानचा दारुण पराभव स्पष्ट दिसत होता, पण तेव्हा आगा सलमानने 51 धावांची खेळी करत पाकिस्तानला द्विशतकासमीप नेले. मात्र सर्वात अनपेक्षित बाब म्हणजे 9 बाद 191 अशी स्थिती असताना मोहम्मद वसीम आणि हारिस रऊफ यांनी 53 धावांची झंझावाती भागी केली. त्यामुळे पाकचा डाव 244 धावांवर संपला.