हमास समर्थकांच्या निदर्शनात पोलिसी बळाचा पूर्ण वापर करा, इंग्लंडच्या गृहमंत्र्यांचे आदेश

इंग्लंडमध्ये हमास समर्थकांनी निदर्शने करायचं ठरवलं आहे. इस्रायलवरील हल्ल्यानंतर करण्यात येणारी ही निदर्शने एकप्रकारे ज्यू समुदायाला धमकावण्याचा प्रयत्न असल्याचं इंग्लंडमधील खासदार सुएला ब्रेव्हरमन यांनी म्हटले आहे, यामुळे सगळ्या पोलीस प्रमुखांनी या निदर्शनांच्या विरोधात पोलिसी बळाचा पूर्ण वापर करावा अशी विनंती केली आहे. इंग्लंडच्या रस्त्यांवर पॅलेस्टीनी जेंडे फडकावणे हे योग्य नाही कारण असे करणे म्हणजे दहशतवादाला समर्थन दिल्यासारखे होईल असे ब्रेव्हरमन यांनी पोलिसांना सांगितले आहे. “फ्रॉम द रिव्हर टू द सी, पॅलेस्टाईन विल बी फ्री” पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणा देणे हे देखील योग्य ठरणार नसल्याचे त्या म्हणाल्या. कारण यातून इस्रायलचे जगाच्या नकाशावरून नामोनिशाण मिटवण्याचा प्रयत्न दिसून येतो असे त्या म्हणाल्या.

पाकिस्तानात पॅलेस्टाईन समर्थकांनी मंगळवारी रात्री निदर्शने केली होती. हजारोंच्या संख्येने पॅलेस्टीनी समर्थक इस्रायली उच्चायुक्तालयाजवळ जमा झाले होते. तिथे त्यांनी पॅलेस्टाईनचे झेंडे फडकावत, पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत निदर्शने केली होती. यातील 3 निदर्शकांना अटक करण्यात आली असून यातील एकाचे वय हे 15 वर्ष इतके आहे. इस्रायल आणि हमासमध्ये युद्धाला सुरुवात झाल्यानंतर अशा पद्धतीची निदर्शने इंग्लंडच्या अनेक भागात पाहायला मिळाली आहे. केन्सिंग्टन ट्यूब स्टेशनबाहेर पॅलेस्टीनी आणि इस्रायली समर्थक आमनेसामने आले होते. त्यांना हटवताना पोलिसांच्या नाकी नऊ आले होते. तणाव निवळावा यासाठी प्रतिष्ठीत पॅलेस्टीनी आणि इस्रायली व्यक्तींशी बोलणी सुरू असून त्यांच्याद्वारे आवाहन करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.