पुणे एक्प्रेस वेवरही हिंदुस्थान सुस्साट, कोहलीच्या शतकामुळे विजयाचा चौकार

>> विठ्ठल देवकाते

मायदेशात होत असलेल्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये विजयाची हॅटट्रिक साजरी केलेल्या टीम इंडियाने पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे लगतच्या एमसीए स्टेडियमवर विजयाचा चौकार ठोकला. सुस्साट सुटलेल्या हिंदुस्थानी संघाने बांगलादेशचा 7 गडी आणि 51 चेंडू राखून पराभव केला. अजेय असलेल्या यजमान संघाने गुणतक्त्यात पुन्हा अव्वल स्थानी झेप घेत उपांत्य फेरीच्या दिशेने दमदार कूच केलीय.

रोहित-गिलची दमदार सलामी

बांगलादेशकडून मिळालेले 257 धावांचे लक्ष्य हिंदुस्थानने 41.3 षटकांत 3 बाद 261 धावसंख्या उभारून पूर्ण केले. कर्णधार रोहित शर्मा (48) व शुबमन गिल (53) यांनी 12.4 षटकांत 88 धावांची दमदार सलामी दिली, मात्र रोहितचे अवघ्या 2 धावांनी हुकलेले शतक चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेले. हसन महमूदच्या गोलंदाजीवर तौहिदकरवी झेलबाद होण्यापूर्वी त्याने 40 चेंडूंत 48 धावा करताना 7 चौकारांसह 2 षटकार ठोकले. शुबनम गिलने 55 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारांसह 53 धावांची खेळी केली. मेहदी हसनने त्याला महमूदुल्लाहकरवी झेलबाद केले.

कोहलीचे झुंजार शतक

सलामीची जोडी तंबूत परतल्यानंतर विराट कोहलीने फलंदाजीची सूत्रे हाती घेतली. त्याने श्रेयस अय्यर (19) व लोकेश राहुल (नाबाद 34) यांना हाताशी धरून हिंदुस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. कोहलीच्या नाबाद 103 धावांच्या खेळीला 6 चौकार व 4 षटकारांचा साज होता. त्याने षटकार ठोकून कारकीर्दीतील 48 वे एकदिवसीय शतक साजरे केले.

दहा षटकांत वापरले 6 गोलंदाज
नाणेफेकीचा कौल जिंकून बांगलादेशने फलंदाजीचा निर्णय घेतला. तंझिद हसन (51) आणि लिटन दास (66) यांनी अर्धशतके झळकावत 14.4 षटकांत 93 धावांची सलामी देत आपल्या संघाला आश्वासक सुरुवात करून दिली. ही सलामी पह्डण्यासाठी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने 10 षटकांत 6 गोलंदाज बदलले, मात्र काही उपयोग झाला नाही. पहिल्या 5 षटकांत धावफलकावर केवळ 10 धावा होत्या. शार्दुल ठाकूरच्या दहाव्या षटकांत तंझिद हसनने 6, 4, 6 ठोकल्याने बांगलादेशची धावसंख्या 63 वर पोहोचली.

हार्दिक पंडय़ा जायबंदी

नवव्या षटकांत हार्दिक पंडय़ा गोलंदाजीला आला. मात्र पहिल्या तीन चेंडूंतच दोन चौकार खाणारा हार्दिक पंडय़ा दुखापतग्रस्त झाला. षटकाच्या तिसऱया चेंडूवर स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पायाने अडवण्याच्या प्रयत्नात हार्दिकचा पाय मुरगळला. त्याच्या घोटय़ाला इजा झाली अन् त्याला षटक अर्धवट सोडून मैदान सोडावे लागले. हार्दिकच्या घोटय़ाचे स्पॅन करण्यात आले असून पुन्हा मैदानातही परतला असल्याची माहिती बीसीसीआयने ट्विट करून दिली.

कोहलीची सहा वर्षांनंतर गोलंदाजी

हार्दिक पंडय़ाला दुखापत झाल्याने त्याचे राहिलेले अर्धे षटक विराट कोहलीने पूर्ण केले. यानिमित्ताने कोहलीने तब्बल सहा वर्षांनंतर गोलंदाजी केली. याआधी त्याने 2017 मध्ये कोलंबोत श्रीलंकेविरुद्ध अखेरची गोलंदाजी केली होती.

कुलदीप आला धावून

वेगवान गोलंदाज बांगलादेशची सलामीची जोडी पह्डण्यात अपयशी ठरत असताना रोहितने 11 व्या षटकांत फिरकीपटू कुलदीप यादवला मोर्चावर आणले. याच कुलदीपने 15 व्या षटकांत तंझिदला पायचित पकडून हिंदुस्थानला पहिले यश मिळवून दिले. तंझिदने 43 चेंडूंत 5 चौकार व 3 षटकारांसह आपली अर्धशतकी खेळी सजवली.

मुशफीकर, महमुदुल्लाहचा प्रतिकार

मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरल्यानंतर मुशफीकर रहीम (38) व महमुदुल्लाह (46) यांनी हिंदुस्थानी गोलंदाजीचा प्रतिकार केला म्हणून बांगलादेशला अडीचशेचा टप्पा ओलांडता आला. जसप्रीत बुमराहने या दोघांचा अडसर दूर केला. त्यानंतर नसुम अहमदला मोहमद सिराजने यष्टीमागे झेलबाद केले. मुस्तफिजुर रहमान एक, तर शोरीफुल इस्लाम 7 धावांवर नाबाद राहिला.

मधल्या फळीचा फ्लॉप शो

सलामीची जोडी फुटल्यानंतर नजमुल होसैन (8) व मेहिदी हसन (3) हे सुद्धा अपयशी ठरले. नजमुलला जाडेजाने पायचीत पकडले, तर सिराजच्या गोलंदाजीवर राहुलने मेहिदीचा अफलातून झेल टिपला. मग जाडेजाने लिटनला गिलकरवी झेलबाद करून बांगलादेशला चौथा धक्का दिला. लिटनने 82 चेंडूंत 66 धावा केल्या.

26 हजार धावा

विराटने आज 77 वी धाव काढताच आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 26 हजार धावांचा टप्पाही गाठला. आता सचिन (34,357), संगक्कारा (28,016), पॉण्टिंग (27,483) हे तिघेच त्याच्या पुढे आहेत. विराटने आज जयवर्धनेला (25,957) मागे टाकले.

जीतेगा भाई जीतेगा… बांगलादेशसाठीसुद्धा प्रेक्षकांच्या टाळय़ा

पुण्यात तब्बल 27 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वर्ल्ड कपची मॅच होत असल्याने पुण्यातील एमसीए स्टेडियमवर हाऊसफुल गर्दी झाली होती. हिंदुस्थान-बांगलादेश लढतीसाठी बांगलादेशचे समर्थक मोजकेच होते, मात्र पाहुण्या संघातील फलंदाजांच्या चौकार-षटकाराला हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमी टाळय़ा वाजवून दाद देत होते. तंझिद हसन व लिटन दास यांच्या अर्धशतकी खेळीलाही पुणेकर क्रिकेटप्रेमींनी टाळय़ा वाजवल्या. हे बघून बांगलादेशी पत्रकारही भारावून गेले. बांगलादेशमधील ‘अजकेर पत्रिका’ या दैनिकाचा क्रीडा पत्रकार एम. डी. राणा अब्बास यानेही हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींचे आभार मानले. हिंदुस्थान व बांगलादेशची संस्कृती सारखीच आहे. मात्र तुम्ही झपाटय़ाने प्रगती केली, आमचा देश यात बराच मागे आहे, अशी प्रांजळ कबुलीही त्याने दिली.

जड्डू मला माफ कर

‘सामनावीरा’चा पुरस्कार हिसकावून घेतल्याबद्दल मी सर्वप्रथम जड्डूची माफी मागतो. जड्डू मला माफ कर. मला एक मोठे योगदान द्यायचे होते. मी वर्ल्ड कपमध्ये अनेक अर्धशतके केली आहेत, पण मी त्याच्यापुढे जात नव्हतो. मी यावेळी त्या अपयशाची मालिका खंडित करू इच्छित होतो आणि मला शेवटपर्यंत थांबायचे होते. जे मी अनेक वर्षे करत आलोय, असे विराट कोहली पुरस्कार मिळाल्यानंतर बोलला. या सामन्यात रवींद्र जाडेजाने प्रभावी गोलंदाजीसह अफलातून झेलही टिपला होता. तोच ‘सामनावीर’च्या यादीत पुढे होता.

उन्हाचा ताप अन् ट्रफिक जॅम

हिंदुस्थान-बांगलादेशदरम्यानचा सामना दुपारी 2 वाजता सुरू झाला, मात्र पुण्यातील गहुंजे येथील एमसीए स्टेडियम खुले आहे. रणरणत्या उन्हाच्या तापामुळे साडेचार वाजेपर्यंत फारसे क्रिकेटप्रेमी स्टेडियमकडे फिरकले नाही. सायंकाळी 5 नंतर मात्र स्टेडियम संपूर्ण भरले. त्यातच काही क्रिकेटप्रेमींना ट्रफिकमुळे स्टेडियमपर्यंत पोहोचण्यास विलंब झाला, मात्र 37 हजार प्रेक्षकसंख्या असलेले हे स्टेडियम नंतर खचाखच भरले.

वर्ल्ड कप स्कोअरबोर्ड
चौकार 793
षटकार 199
अर्धशतक 045
शतक 013
विकेट 253
3 विकेट 025
धावा 8697
चेंडू 8996

सर्वाधिक धावा
रोहित शर्मा 265
सर्वाधिक विकेट
मिचेल सॅण्टनर 11

वर्ल्ड कप गुणतालिका
संघ सा. वि. प. गुण नेररे
न्यूझीलंड 4 4 0 8 +1.923
हिंदुस्थान 4 4 0 8 +1.659
द. आफ्रिका 3 2 1 4 +1.335
पाकिस्तान 3 2 1 4 -0.137
इंग्लंड 3 1 2 2 -0.084
ऑस्ट्रेलिया 3 1 2 2 -0.734
नेदरलॅण्ड्स 3 1 2 2 -0.993
बांगलादेश 4 1 3 2 -0.784
अफगाणिस्तान 4 1 3 2 -1.250
श्रीलंका 3 0 3 0 -1.532