माय-लेकाला पोलिसांचा मदतीचा हात; उपचारासाठीचे टॅक्सीत विसरलेले पैसे तासाभरात मिळवून दिले

भावाच्या उपचारासाठी होणारा खर्च लक्षात घेऊन बिहारचा तरुण व त्याच्या आईने 95 हजारांची रोकड जमवली होती. पण केईएम इस्पितळातून परतताना रोकड ठेवलेली आईची पर्स टॅक्सीतच राहिली हे लक्षात येताच माय-लेकाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तत्काळ भोईवाडा पोलीस ठाणे गाठून घडला प्रकार सांगितला. पोलिसांनीदेखील तत्काळ तपास करत दोन तासांच्या आत त्या माय-लेकाला मोठा दिलासा दिला.

बिहारच्या औरंगाबाद येथे राहणारा संजीत कुमार सिंग (34) हा त्याच्या आईसमवेत मंगळवारी भावाला उपचारासाठी केईएम इस्पितळात घेऊन आला होता. उपचार करून ते माघारी परतले आणि टॅक्सीने हिंदमाता येथे उतरले. मुलाच्या उपचाराच्या टेन्शनमध्ये असलेल्या संजीतच्या आईची पर्स टॅक्सीतच राहून गेली. काही वेळानंतर आपली पर्स सोबत नसल्याचे लक्षात येताच संजीतच्या आईला धक्काच बसला. कारण पर्समध्ये मुलाच्या उपचारासाठी आणलेले 95 हजार रुपये होते. आता करायचे काय अशा द्विधा मनःस्थितीत सापडलेल्या संजीत व त्याच्या आईने थेट भोईवाडा पोलीस ठाणे गाठले. घडला प्रकार त्यांनी ठाणे अंमलदार उपनिरीक्षक कोयते यांना सांगितला. मग वरिष्ठ निरीक्षक सुभाष बोराटे यांच्या सूचनेनुसार अंमलदार कोचरेकर, गस्ते व सचिन घाडगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये टॅक्सी आणि टॅक्सीचा नंबर मिळून आला. मग त्याआधारे टॅक्सी चालकाचा मोबाईल पोलिसांनी मिळवला. त्यानंबरवर संपर्क साधल्यावर टॅक्सी माटुंगा येथे असल्याचे समजताच टॅक्सीचालकास तत्काळ पोलीस ठाण्यास येण्यास सांगितले. त्यानुसार टॅक्सी भोईवाडय़ात येताच संजीतच्या आईची टॅक्सीत विसरलेली पर्स मिळून आली. पर्स आणि त्यातील रोकड पोलिसांनी संजीत व त्याच्या आईच्या स्वाधीन केली. अवघ्या तासाभरात हरवलेले पैसे पोलिसांनी झटपट कारवाई करत परत मिळवून दिल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला.