
महागणपती, स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणारे हुतात्मे आणि घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शपथ घेऊन तिसऱ्या मुंबईविरोधात रायगड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी वज्रमूठ आवळली आहे. उरण, पनवेल, पेण व कर्जत तालुक्यांतील १९८ गावांमध्ये तिसरी मुंबई वसवण्याचा घाट सरकारने घातला आहे. मात्र वर्षानुवर्षे या काळ्या आईची सेवा केलेली ती जमीन हिरावून घेतली जाणार असल्याने भूमिपुत्र बेजार होणार असून तेथील ग्रामस्थांनी आता सरकारविरोधात लढ्याचे रणशिंग फुंकले आहे. प्राण गेला तरी बेहत्तर पण आमच्या जमिनी देणार नाही.. हिंमत असेल तर शेतकऱ्यांच्या मृतदेहावरच सरकारने तिसरी मुंबई उभारावी असा निर्वाणीचा इशारा देण्यात आल्याने कोणत्याही क्षणी संघर्षाची ठिणगी पेटण्याची शक्यता आहे.
काही वर्षांपूर्वी सरकारने सिडकोच्या मदतीने नवी मुंबई वसवली. आता तेथील लोकसंख्या झपाट्याने वाढल्याने तिसरी मुंबई निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. उरण, पनवेल, पेण तालुक्यातील १२४ महसुली गावे आणि कर्जत व अलिबागची वाढीव ७४ महसुली गावे अशी एकूण १९८ गावांवर तिसरी मुंबईचा प्रकल्प राबवला जाणार आहे. या प्रकल्पामुळे कसत्या जमिनी व घरेही जाणार असल्याने शेतकरी बेजार झाले आहे. त्यांना सरकारने भरघोस मोबदला देऊ असे आश्वासन दिले असले तरी भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी देण्यास सपशेल नकार दिला आहे.
तिसऱ्या मुंबईविरोधात एमएमआरडीए, केएससीएल नवनगर (तिसरी मुंबई) विरोधी संघर्ष समिती स्थापन झाली आहे. पुढील लढ्याची रूपरेषा ठरवण्यासाठी रविवारी चिरनेर येथील हुतात्मा स्मारकासमोर मेळावा आयोजित करण्यात आला होता.
तिसऱ्या मुंबईच्या प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने साडेबावीस टक्क्यांचे आरक्षण देऊ असे आश्वासन दिले आहे. पण टक्केवारीची भाषा करणारे सरकार आम्हाला बिल्डर समजते काय, असा संतप्त सवाल या मेळाव्यात करण्यात आला.
या मेळाव्यात माजी आमदार मनोहर भोईर, बाळाराम पाटील, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील, उल्का महाजन, कामगार नेते ॲड. सुरेश पाटील, ॲड. मेघनाथ पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. मनीष पाटील, सुधाकर पाटील, रूपेश पाटील यांचीही भाषणे झाली.
शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतरच प्रशासनाला जाग येणार काय?
चिरनेर येथे झालेल्या तिसऱ्या मुंबईविरोधातील मेळाव्यात माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी मार्गदर्शन केले. सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करत ते म्हणाले की, तिसरी मुंबईची घोषणा करणारे लोक आपले नाहीत. ही मुंबई नेमकी कुणाला हवी आहे, येथील जमिनी कोणी विकत घेतल्या आहेत याचा जरा शोध घ्या. या प्रकल्पामुळे शेती नष्ट होणार असून निसर्गाची वाट लागणार आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत आम्ही माघार घेणार नाही. संघर्ष सुरूच राहणार असून शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर सरकार व प्रशासनाला जाग येणार काय, असा थेट सवाल कोळसे-पाटील यांनी केला.




























































