मध्यरात्री थरार; पोलिसांचा गोळीबार, चोरटे फरार , सोलापुरात गावठी पिस्तुल, कारसह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर  शहरात मध्यरात्रीच्या सुमारास अविनाशनगरमध्ये सराफाचे दुकान फोडण्यासाठी आलेल्या चार चोरटय़ांवर पोलिसांनी गोळीबार केला. पण अंधाराचा फायदा घेत चोरटे फरार झाले असून, गावठी पिस्तूल, कारसह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नीलमनगर येथील ‘बालाजी ज्वेलर्स’ दुकान फोडण्यात आले आहे. यातील चोरटय़ांनी सोलापुरातील कार चोरून ही चोरी केली होती. ही चोरीची कार अविनाशनगरजवळील कोंडय़ाल शाळेजवळ असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी लावली होती. त्याच कारचा वापर करीत आणखी सराफ दुकान फोडण्यासाठी चोरटे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने या ठिकाणी सापळा रचण्यात आला होता.

मध्यरात्री दीडच्या सुमारास चार चोरटे दुचाकीवरून आले असता, पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यांतील एका चोरटय़ाने पलायन केले. काही चोरटे कारमधून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलीस उपनिरीक्षक रजपूत यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला; परंतु चोरटय़ांनी पोलीस पथकावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याने रजपूत यांनी कारवर गोळीबार केला. यात एक गोळी कारच्या चाकात लागल्याने कार काटेरी झुडपात गेली व काचेलाही गोळ्या लागल्या.

दरम्यान, अंधाराचा फायदा घेत चोरटे पळून गेले. कारची तपासणी केली असता, त्यात गावठी पिस्तूल, कटावणी, पकड असे साहित्य आढळले. पोलिसांनी तीन लाख 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक विक्रम रजपूत व त्यांच्या पथकाने केली. या घटनेमागे स्थानिक चोरटय़ांनी मदत केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शहर व जिह्यात पिस्तुलांचा सुळसुळाट

n एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या 15 दिवसांत पिस्तूल सापडण्याची दुसरी घटना आहे. यापूर्वी सुनीलनगरमध्ये अट्टल गुन्हेगाराकडून दोन पिस्तुले व पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. तर, दोन दिवसांपूर्वी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. या वस्तूमुळे लोकांच्यात भितीचे वातावरण आहे.