पंजाबमधील गुरुद्वारात निहंग शीख आणि पोलिसांमध्ये चकमक, गोळीबारात एका जवानाचा मृत्यू

पंजाबमधील कपूरथला (Kapurthala) येथील एका गुरुद्वारामध्ये निहंग शीख आणि पोलिसांमध्ये जोरदार चकमक उडाली. यादरम्यान झालेल्या गोळीबारामध्ये एका जवानाचा मृत्यू झाला असून तीन जवान जखमी झाले आहे. पोलीस काही निहंग शीखांना अटक करण्यासाठी गेली असताना ही घटना घडली अशी माहिती कपूरथलाचे एसपी तेजबीर सिंग हुंदल यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, कपूरथला येथील सुल्तानपूर लोधी गुरुद्वारामध्ये निहंग शीखांच्या दोन गटांमध्ये राडा झाला होता. निहंग शीखांचा एक गट गुरुद्वारा चालवतो, तर दुसऱ्या गटातील जवळपास 30हून अधिक निहंग शीखांनी गुरुद्वारावर कब्जा केला. पहिल्या गटाच्या तक्रारीवरून दुसऱ्या गटाच्या निहंग शीखांना अटक करण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. याच दरम्यान निलंग शीखांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारामध्ये पंजाब पोलिसांतील एका कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला, तर तीन जखमी झाले.

दरम्यान, जखमी जवानांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थिती बिघडू नये म्हणून येथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.