विद्यापीठे, महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय कुलगुरूंच्या अभिप्रायानंतर

मुंबईसह राज्यात कोरोनाच्या तिसऱया लाटेचे सावट निर्माण झाले असून या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी रात्री उशिरा मुंबईसह राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरू, रजिस्टार, उच्च शिक्षण विभागातील अधिकारी यांची आढावा बैठक घेतली. मुंबई, पुण्यासारख्या शहरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडत असल्याने राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालये सुरू ठेवणे कितपत योग्य राहील यावर चर्चा करण्यात आली. तसेच या विषयावर कुलगुरूंनी येत्या काही दिवसांत अभिप्राय सादर करण्याच्या सूचनाही उदय सामंत यांनी दिल्या आहेत. कुलगुरूंकडून अभिप्राय आल्यानंतर विद्यापीठे आणि महाविद्यालये सुरू ठेवायची की नाहीत यावर धोरणात्मक निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन पद्धतीने पार पडलेल्या या बैठकीला राज्यभरातील विद्यापीठांचे कुलगुरू, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक धनराज माने, तंत्रशिक्षण संचालक अभय वाघ, अकृषी विद्यापीठांचे सर्व कुलगुरू उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये सध्या सुरू असलेल्या परीक्षा, अभ्यासक्रमांचा आढावा घेत कोरोना परिस्थितीवर काय उपाययोजना करता येतील, यासाठीच्या सूचना उदय सामंत यांनी कुलगुरूंना केल्या. पदवी महाविद्यालये आणि विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचारी यांच्या लसीकरणाविषयी बैठकीत चर्चा झाली.

बैठकीत कुलगुरूंनी आपल्या परिसरातील सध्या निर्माण झालेल्या कोरोना परिस्थितीची माहिती दिली. उदय सामंत यांनी सुचविलेल्या उपाययोजनांवर येत्या काही दिवसांत कुलगुरूंकडून अभिप्राय मागवले जाणार असून त्यानंतर राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालये बंद ठेवायची की सुरू ठेवायची याविषयीचा निर्णय घेतला जाणार आहे.