अब की बार भाजपा तडीपार हा महाराष्ट्राचा नारा हवा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले आहेत. रविवारी संध्याकाळी कणकवली येथे उद्धव ठाकरे यांची विराट सभा पडली. या सभेत भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी भाजप व मिंधे गटावर सडकून टीका केली. ‘महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर गेल्या चार दिवसांपासून एक भगवं वादळ आलं आहे. हे वादळ दिल्लीच्या दिशेने जात असून ज्यांच्या डोक्यात मस्ती गेली आहे त्यांना हे वादळ मुळापासून उपटून टाकणार”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. यंदाच्या निवडणूकीत अब की बार भाजपा तडीपार हा महाराष्ट्राचा नारा हवा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

”गेले चार दिवस मी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर फिरतोय. रायगड जिल्हा झाला आज सिंधुदुर्गात आहे. काही वर्षांपूर्वी इथे तौक्ते आणि निसर्ग वादळं आली आणि नुकसान करून गेली. मात्र आता सध्या कोकण किनारपट्टीवर एक भगवं वादळ दिसतंय व ते दिल्लीच्या दिशेने चाललंय. ज्यांच्या डोक्यात मस्ती आहे त्यांना मूळासकठ उपटून टाकणारं हे वादळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव मंदीर या सिंधुदुर्गात आहे. आजपर्यंत कुणाला सुचलं नव्हतं की राजाला एक शोभेसे सिंहासन करावं. आता जे केलंय ते हे सिंहासन सोन्याचं नाहीए. आपल्या महाराष्ट्रासारखं कणखर देशा राकट देशा दगडांच्या देशा तसं हे सिंहासन देखील दगडाचं आहे. पण सध्या महाराष्ट्रात जे चाललं आहे ते गुंडांच्या देशा, नामर्दांच्या देशा सारखं आहे. हा आपला महाराष्ट्र नाहीए. दिल्लीसमोर न झुकणारे शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन पुढे निघालेल्या विचारांच्या वारसदारांचा हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात जो जन्माला येतो. तो जन्मजात शिवप्रेम घेऊन येतो. त्याला शिवप्रेम शिकवावं लागत नाही. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान महाराष्ट्रात येऊन गेले. हल्ली त्यांना सतत यावंसं वाटतंय. मध्ये सिंधुदुर्गात आले खरे पण इथलं जे वैशिष्ट्य आहे. त्या सिंधुदुर्ग किल्ल्यात गेलेच नाही. आणि मंदिरातही गेले नाही. मला असं वाटलं होतं ते महाराजांसमोर नतमस्तक होतील. संकटामध्ये कधीही न आलेले पंतप्रधान या निमित्ताने तरी महाराष्ट्राला काहीतरी भरघोस देऊन जातील. दिलं तर काही नाही. पण आपल्याकडे येणारा पाणबुडी प्रकल्प गुजरातला घेऊन गेले. आता ते मला भीती वाटतेय की जेव्हा जेव्हा ते इथे येतील आणि जे चांगलं आहे ते घेऊन जातील. मोदीजी तुम्ही देशाचे पंतप्रधान आहे. गुजरात समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल ही मोदीजींची भावना आहे. पण आमचा महाराष्ट्र समृद्धच आहे. हा साधूसंताचा, वीरांचा, मर्दांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा , शाहु फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र कशातही मागे नाही. गुजरातही आमचाच आहे. महाराष्ट्रभर गुजराती लोकं राहत आहेत. कधीही आम्ही आणि गुजराती दंगा नाही झाला. ज्या ज्या वेळेला गुजरात संकटात होता, आम्ही त्यांच्यासोबत उभे राहिलो. भुजच्या भुकंपाच्या वेळी शिवसेनेने मदत केली होती. सुरेशदादा जैन माझ्यासोबत होते. मी स्वत: तिथे गेलो होतो. महापूर आला होता तेव्हाही शिवसैनिक आले होते. आमचा काही दुजाभाव नाही त्यांच्याबद्दल. गुजरातला समृद्ध करा. पण महाराष्ट्राचं जे काही आहे ते पळवून नेणार असाल आणि हे मिंधे त्यांचे शेपूट हलवत खुर्ची चाटत त्यांची चाकरी करणार असतील तर यांना आपल्याला गाडावं लागेल व त्यांना गाडण्याची ताकद महाराष्ट्रात आहे”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

या भाषणात उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे, नितशे राणे व निलेश राणे यांच्यावरही जोरदार टीका केली. ”त्या कोंबडी चोरांबद्दल मी काय बोलणार. ते बोलायच्या लायकीचे नाहीत. कोकणात राजापूरची गंगा येते. तिची आपण पूजा करतो. दुर्दैवाने या मतदारसंघात एक गटार गंगा आहे. तर त्याला काय करू शकतो. ही गटारगंगा अत्यंत घाणेरडी आहे. मोदीजी मध्ये म्हणाले होते मी रोज दोन तीन किलो शिव्या खातो. मग प्रधानमंत्रीची तुमची ही भोकं पडलेली तिनपाट आहेत ते काय आम्हाला रसगुल्ले देतात. मी नेहमी शिवसैनिकांना सांगितलं आहे की त्यांना संस्कार नाहीएत. ते बोलतील त्यांच्या भाषेत त्यांना त्या भाषेत उत्तर द्यायचं नाही. पण यापुढे ते तिनपाट बोलल्यानंतर जिथे जिथे माझं नाव असेल त्या जागी भाजप नेत्याचं नाव टाका आणि तसं वाचा”, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले.

एक वेळ असा होता जेव्हा भाजप व शिवसेना राजकारणात अस्पृश्य मानले जात होते. त्या काळात भाजपला जर कुणी तारलं असेल तर माझ्या वडिलांनी. त्यांचा मी सुपुत्र आहे. आज तुम्हाला घराणेशाही म्हटल्यानंतर चटके बसतात. ज्या शिवसेनाप्रमुखांनी अटलजींच्या वेळी तुम्हाला वाचवलं. जर त्यावेळी शिवसेनाप्रमुख तुमच्या मागे उभे राहिले नसते तर अटलजींनी तुम्हाला केराच्या टोपलीत टाकलं असतं. आज त्यांच्याच मुलाला तुम्ही राजकारणातून खतम करायला निघाला आहात. या मग. पण एक लक्षात घ्या आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. जर भाजपमध्ये थोडा तरी मर्दपणा असेल तर ईडी सीबीआय़ इनकम टॅक्स व नाईलाजाने पोलीस हे जे तुमचे घरगडी आहेत त्यांना बाजूला ठेवा आणि मैदानात या. बघूया कोण कुणाच्या पाठीला माती लावतो. ही लोकशाही आहे ना मग हुकुमशाहीसारखे कसे मागे लागता, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

अबकी बार 400 पार बोलतात. पण यांची पण मॅच कशी, बॉलिंग यांचीच बॅटिंग याचीचं. अंपायर यांचाच. आऊट जरी झाले तरी सिक्सर याला नपुंसकपणा म्हणतात. तुम्ही विश्वगुरू आहात जगातला मोठा पक्ष आहे तुमचा. जर तुम्ही 400 पार होणार असाल तर फोडाफोडी का करताय. शिवसेना नाव चोरलं धनुष्यबाण चोरलं. भगव्यात छेद केला. तरीही उद्धव ठाकरेच्या मागे लागले आहेत. माझ्या झोपडपट्टीत राहणाऱ्या शिवसैनिकाच्या घरीही ईडी जाते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

”भाजपच्या आमदाराने पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला. ज्याच्यावर झाडल्या तो चिंताजनक आहे. माझे या गोळीबाराला समर्थन नाही. पण गणपत गायकवाडला एवढी अक्कल नसेल का की गोळीबार केल्यानंतर आपल्याला तुरुंगात जावं लागेल. एवढा काय तो बुद्धू आहे. त्याचं सगळं सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलं. त्याने स्वत: स्टेटमेंटच दिलं की मी गोळ्या घातल्या. काय झालं असेल असं की त्याने गोळीबार केला. एखादा खुनाचा प्रयत्न करतो तेव्हा तो डिवचला गेलेला असतो. पोलीस स्टेशनच्या दारात त्याच्या लेकाला धक्काबुक्की झाली. त्याचे करोडो रुपये मिंधे कडे आहेत. याची कोण चौकशी करणार. याबाबत कोण बोलतंय भाजपमधून. भाजप आमदारांची ही दयनीय परिस्थिती येईपर्यंत गृहमंत्री कुठे होते? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

‘आता मोदीजींना घराणेशाहीबाबत नवा साक्षात्कार झालाय. मग आता इथली सुक्ष्म लघू मध्यमची देखील घराणेशाही राहणार नाही. या तिनपाटांची भोकं पडलेली घराणेशाही राहणार नाही. पंतप्रदान जाहीर करणार असतील. ते तिनपाट तरी जाहीर करताील का. यांना मोदीजी आता देवासारखे आहेत. तर मग करा जाहीर की आमच्या देवाची इच्छा आहेत त्यामुळे आम्ही आता निवृत्त होतोय. कल्याणमध्येही गद्दारांची घराणेशाही आहे. रायगड. नगर, सिंधुदुर्गात घराणेशाही आहे ही घराणेशाही चालते पण तुमच्या सोबतीने हिंदुत्वाचा भगवा झेंडा घेऊन चालणारा उद्धव ठाकरे यांना चालत नाही. शिवसेना नाही चालत हे असले सडके विचार आहेत यांचे. पण मला त्यांच्या पक्षाशी देणंघेणं नाही. आपल्याला खत्म करायच्या नादात हे सर्व गुडांपुढे हतबल झाले आहेत. गोळीबार केला त्याला अटकेत टाकला, या मिंध्या्च्या एका आमदाराने गणपतीत गोळीबार केला होता. त्याला आत क्लिनचीट मिळेल. दुसऱ्याच्या एकाने बिल्डरच्या पोराला पळवला होता. तुम्ही जितका भ्रष्टाचार करायचा तो करा पण भाजपात या तुम्हाला काही होणार नाही. ही मोदी गॅरंटी आहे.

”देशात इंग्रजांची सत्ता होती. ते म्हणाले होते आमच्या सत्तेचा सूर्य कधीही मावळत नाही. ही त्यांची मस्ती होती. आता त्यांच्या देशात हिंदुस्थानी वंशाचा माणूस पंतप्रधान आहे. ही विदेशीची मस्ती उतरू शकते तर देशीची मस्ती देखील उतरवू शकतो. देशासमोर किती प्रश्न आहेत एकीकडे चीन घुसतोय. पाकव्याप्त कश्मीर एक इंच देखील घेऊ शकलेलो नाही. यांचं फक्त विरोधक संपवण्याचं सुरू आहे. पूर्वी राम मंदिरासाठी विटा जमवल्या यांनी. आता घराघरात अक्षता वाटल्या. मी काही नास्तिक नाही. प्रभू रामचंद्राचा भक्त आहे. एककीकडे देशात कुपोषणाने बालकं मरत असताना तुम्ही धान्य फुकट घालवता. 80 टक्के जनतेला धान्य फुकट देतोय असं सांगतात. म्हणजे 80 टक्के जनता ही बेरोजगार आहे. मग तुम्ही रोजगार दिला कुणाला. प्रश्न विचारत नाही. प्रश्न विचारला तर आम्ही देशद्रोही आहे. तुम्ही माझ्या देशाचे पंतप्रधान आहात. तुम्हाला प्रश्न विचारल्यावर जर तुम्ही मला देशद्रोही ठरवत असाल तर या देशाची जनता सिंहासनावरून खाली उतरवल्याशिवाय राहणार नाही. ही याजनतेची ताकद आहे. खरंच मला काही वेळेला. भाजप आरएसएसची कीव येते. ही दिशा ही हुकुशाहीची आहे. ही हुकुमशाही ठेचली नाही तर संपूर्ण देशाची वाट लागेल. ही लढाई केवळ माझी नाही, तुमची आहे. तुमच्या भावी पिढीसाठी आहे. तुमच्या भावी पिढ्या हुकुमशाहाच्या ताब्यात देण्याची तयारी आहे का? असा खणखणीत सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.