अवकाळी पावसाने कोल्हापूरला झोडपले

वादळी वाऱयासह मेघगर्जना करीत आलेल्या अवकाळी पावसाने आज सायंकाळी कोल्हापूरकरांना चांगलेच झोडपले. या पावसाने अनेकांची त्रेधातिरपीट उडाली असली, तरी प्रचंड उष्म्याने अंगाची लाहीलाही झालेल्या कोल्हापूरकरांना सुखद गारवा मिळाला.

वादळी वाऱयामुळे शहरात जिकडे-तिकडे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले होते. काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. झाडांच्या फांद्या व केबल तुटून पडल्याने वाहतुकीची कोंडी झाल्याचे दिसून आले.

जिह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमान 40 डिग्रीच्या पुढे गेल्याने कोल्हापूरकर उकाडय़ाने त्रस्त झाले आहेत. गेल्या काही दिवसांत ग्रामीण भागात वळवाच्या पावसाने हजेरी लावली. दोन-तीन दिवसांपूर्वी शहरातही काहीसा वळीव बरसला होता. त्यानंतर हवेत कमालीचा उकाडा जाणवत होता. जोतिबाच्या चैत्री यात्रेवेळी हमखास पावसाची हजेरी असते. त्यामुळे सर्वांना पावसाची उत्सुकता लागून राहिली होती.

आज दुपारपासूनच जिह्यात पावसाचे वातावरण झाले. सायंकाळी पाचच्या सुमारास मेघगर्जनेसह वादळ वाऱयास सुरुवात झाली. ठिकठिकाणी कचरा हवेत उडाल्याने जिकडे तिकडे कचराच कचरा झाला होता. सुरुवातीस हलक्या सरी कोसळल्या. त्यानंतर झालेल्या जोरदार पावसामुळे कोल्हापूरकरांना काही काळ सुखद गारवा अनुभवता आला. शहरासह उपनगरातील काही भागात वीजपुरवठा खंडित झाल्याचेही दिसून आले.

झाड पडून दुचाकीस्वार गंभीर जखमी

सायंकाळी पाचच्या सुमारास शहरात मेघगर्जनेसह वळीवाच्या पावसाचे वातावरण झाले. वादळी वाऱयामुळे तर वाहनधारकांची अक्षरशः त्रेधातिरपीट उडाली होती. करवीर पंचायत समिती परिसरात जैन बार्ंडग येथे धावत्या दुचाकीवर अचानक झाड कोसळल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. आज पाचच्या नागरिकांनी तत्काळ जखमीला सीपीआर रुग्णालयात दाखल केले.