ससून रुग्णालय की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा? वडेट्टीवारांचा सवाल; पोलीस ते हॉस्पिटल सगळ्यांच्या चौकशीची मागणी

पुण्यातील कल्याणीनगर भागामध्ये बिल्डरपुत्राने पोर्शे गाडीने तरुण-तरुणीला चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेमध्ये रोज नवनवीन खुलासे होत असून सोमवारी पोलिसांनी मोठी कारवाई करत ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक केली. आरोपी मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून यानंतर विरोधक आणखी आक्रमक झाले आहेत. पुण्यातील ससून रुग्णालय हे रुग्णालय आहे की ‘गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा’ आहे? असा परखड सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

पुण्यातील ससून रुग्णालय हे रुग्णालय आहे की ‘गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा’ आहे? आधी ललित पाटीलचे धंदे याच हॉस्पिटल मधून सुरु होते. ललित पाटीलचे अवैध धंदे सरकारमधील कोणत्या मंत्र्याच्या आशीर्वादाने सुरू होते हे महाराष्ट्राला माहिती आहे आता पुण्याच्या आरोपीला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी ब्लड रिपोर्ट मध्ये फेरफार केली. हे हॉस्पिटल गुंड आरोपी यांच्यासाठी आहे का? असा सवाल वडेट्टीवार करत ललित पाटील प्रकरणापासून या हॉस्पिटलच्या कारभारावर आधीच शंका होती, पण सरकार आणि रुग्णालय प्रशासनाने या शंकेवर शिक्कामोर्तब केले, असे वडेट्टीवार म्हणाले.

Pune porsche accident : ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना बेड्या; ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप

पुणे ‘हिट अँड रन’ प्रकरणात पूर्ण व्यवस्थेने आरोपीला मदत केली आहे. दारू पिऊन दोन लोकांची हत्या करणाऱ्याला मदत करण्यासाठी किती जणांनी मेहनत घेतली हे समोर येत आहे. या सर्वांना कठोर शिक्षा व्हायला हवी. म्हणून आम्ही न्यायिक चौकशीची मागणी करत आहोत. पोलिस ते हॉस्पिटल सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.