IND vs WI – 500व्या लढतीत ‘किंग’ कोहलीने रचले विक्रमांचे इमले

हिंदुस्थान आणि वेस्ट इंडिज संघात पोर्ट ऑफ स्पेनच्या क्विन्स पार्कमध्ये दुसरा आणि अंतिम कसोटी सामना खेळला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत हिंदुस्थानने 4 विकेटच्या मोबदल्यात 288 धावा केल्या आहेत. खेळ थांबला तेव्हा विराट कोहली 87, तर रवींद्र जडेजा 36 धावांवर नाबाद होते.

विराट कोहली याचा हा 500 वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. या लढतीत अर्धशतकीय खेळी साकारताच विराट कोहली याने विक्रमांचे इमले रचले. सध्या तो 76व्या कसोटी शतकापासन फक्त 13 धावा दूर असून शुक्रवारी त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

34 वर्षीय विराट कोहली याने 161 चेंडूत 8 चौकारांसह अर्धशतकीय खेळी केली आहे. जडेजा आणि कोहलीमध्ये पाचव्या विकेटसठी 201 चेंडूत 106 धावांची भागिदारी झाली आहे. तत्पूर्वी कर्णधार रोहित शर्मा 80 आणि यशस्वी जैस्वाल यांनी हिंदुस्थानने दमदार सुरुवात करून दिली.

यशस्वी आणि रोहित बाद झाल्यानंतर विराट कोहली याने हिंदुस्थानच्या फलंदाजीची धुरा खांद्यावर घेत चौफेर फटकेबाजी केली. यादरम्यान त्याने दमदार अर्धशतकही ठोकले. 500व्या आंतरराष्ट्रीय लढतीमध्ये अर्धशतक ठोकणारा विराट पहिला फलंदाज ठरला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्येही विराटने एक पाऊल पुढे टाकले आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज जॅक कॅलिस याला मागे टाकत विराटने पाचवे स्थान पटकावले आहे. तसेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 2000 धावांचा टप्पाही त्याने पार केला. विराट व्यतिरिक्त फक्त रोहित शर्मा अशी कामगिरी करू शकला आहे. तसेच विराट यंदाच्या वर्षात हिंदुस्थानकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा

34357 – सचिन तेंडुलकर (हिंदुस्थान)
28016 – कुमार संगकारा (श्रीलंका)
27483 – रिकी पोंटिंग (ऑस्ट्रेलिया)
25957 – महेला जयवर्धने (श्रीलंका)
25548 – विराट कोहली (हिंदुस्थान)