कळझोंडी धरणातले पाणी आटले; 22 हजार ग्रामस्थांवर पाणी टंचाईचे संकट

रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी धरण आटल्यामुळे परिसरातील गावांसमोर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे. आजूबाजूच्या गावातील सुमारे 22 हजार ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणी टंचाईच्या काळात आता ग्रामस्थांची तहान कशी भागवणार असा यक्षप्रश्न उभा राहिला आहे. प्रशासनाकडून अद्याप कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.

कळझोंडी धरणाचे काम दोन वर्ष रखडले होते. या धरणाचे काम संथ गतीने सुरु असल्याने गेल्यावर्षी उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. 2023 साली एप्रिल मे महिन्यात धरणातील पाणी आटल्यामुळे परिसरातील गावात पाणीटंचाई निर्माण झाली होती. यंदा डिसेंबर महिन्यातच कळझोंडी धरणातील पाणी आटल्यामुळे परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कळझोंडी धरणावर परिसरातील 14 गावे अवलंबून आहेत. त्यामध्ये सैतवडे, जांभारी, वाटद, कळझोंडी, गडनरळ, आगरनरळ, पन्हळी, सत्कोंडी, कांबळेलावगण, चाफेरी, कासारी आणि वरवडे या गावांचा समावेश आहे. या गावातील सुमारे 22 हजार ग्रामस्थांसमोर आता पाणी टंचाईची मोठी समस्या उभी ठाकली आहे.

कळझोंडी धरणातील पाण्यावर ग्रामस्थ अवलंबून असल्यामुळे त्यांना आता पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. कळझोंडी धरणाचे काम सध्या सुरु आहे. कळझोंडी धरणाची उंची पाच मीटरने वाढवण्यात येणार आहे. धरणाची उंची वाढल्याने धरणातील पाण्याचा साठा वाढणार आहे. तसेच धरणाचे मजबूतीकरण करण्याचे काम सुरु आहे. धरणाच्या कॉक्रिटीकरणानंतर धरणातील गळती कमी होऊन पाणीसाठा वाढण्याची शक्यता आहे. मात्र हे काम संथगतीने सुरु असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

प्रशासनाच्या टँकरची प्रतिक्षा
पाणी टंचाईच्या काळात प्रशासनाकडून टँकरने पाणी पुरवठा केला जातो. मात्र ही पाणी टंचाई मार्च ते एप्रिल महिन्यात उदभवते. यंदा मात्र जानेवारी महिन्यातच 14 गावांमध्ये पाणी टंचाईचे संकट उदभवल्यामुळे प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. जेएसडब्ल्यू कंपनीकडून पाणी पुरवठा होईल अशी ग्रामस्थांना अपेक्षा आहे. मात्र जेएसडब्ल्यू कंपनी ही जेमतेम जयगड गावाला पाणी पुरवठा करते. त्यामुळे आता उर्वरित गावांचे काय होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या ग्रामस्थ पाणी विकत घेत आहेत. मात्र पाणी किती दिवस विकत घेणार असा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा ठाकला आहे.

‘धरणाच्या व्यथा’तून ‘सामना’ने समस्यांवर टाकला होता प्रकाशझोत
दैनिक सामनामधून धरणांच्या व्यथा ही मालिका प्रसिध्द करण्यात आली होती. त्या मालिकेतून कळझोंडी धरणाची व्यथा मांडण्यात आली होती. त्याच बातमीमध्ये एप्रिल महिन्यात कळझोंडी धरण आटल्याने निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर भाष्य करताना धरणाचे काम संथगतीने सुरु असल्याचे नमूद करण्यात आले होते.