11 वाजून 11 मिनिटांनी 11,111 झाडांची लागवड, कळंबवासीयांचा अनोखा उपक्रम

कळंब व शहर हरित करण्यासाठी,पोलिस प्रशासन व सकल कळंबकर यांच्या वतीने अकरा वाजून अकरा मिनिटांनी, 11,111 झाडांची एकाच वेळी लागवड करण्यात आली. या उपक्रमात तालुक्यातील 11000 शालेय विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्तेदेखील सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मान्यवरांनी हजेरी लावली होती. राष्ट्रगीत संपल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आणि याचवेळी रोपट्यांची लागवड करण्यात आली.

कळंब व परिसरात अकरा हजार एकशे अकरा झाडांची लागवड एकाच वेळी, एकाच दिवशी करण्याचं ठरवण्यात आलं होतं. यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून, पोलिस प्रशासन व कळंबकर परिश्रम घेत होते. या सगळ्यांच्या परीश्रमामुळे एकाच दिवशी, एकाच वेळी झाडे 11,111 वृक्षलागवडीचा एक अनोखा उपक्रम कळंबवासीयांनी आपल्या नावे केला आहे. या उपक्रमामध्ये कळंब शहरातील, सर्व शाळा, कॉलेज, विविध संघटना, महिला वर्ग, कर्मचारी, व्यापारी यांनी मनापासून सहभाग घेतला होता. महिलांनी हरिनामाचा गजर करून, व पूजा करून वृक्ष लागवड केली. या उपक्रमात पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, आमदार कैलास पाटील हे देखील सहभागी झाले होते.

या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून वृक्ष लागवडीस वेळ दिला होता. या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना रोपं देण्यात आली. वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी आमदार कैलास घाडगे पाटील यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्याकडे दोन लाख रुपयाचा धनादेश सुपुर्द केला