नगर अर्बन बँकेची 12.78 कोटींची कर्जवसुली

रिझर्व्ह बँकेने नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा बँकिंग परवाना रद्द केल्यानंतर केंद्र शासनाने बँकेवर नोव्हेंबर 2023मध्ये अवसायक म्हणून एनसीडीसीचे संचालक गणेश गायकवाड यांची नियुक्ती केली होती. दरम्यान, पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये 23 एप्रिलअखेर बँकेच्या थकीत कर्जापैकी 12 कोटी 78 लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत, अशी माहिती बँक प्रशासनाने दिली.

पहिल्या व दुसऱया टप्प्यात 17,200 ठेवीदारांचे 293.57 कोटी रुपये डीआयसीजीसीच्या माध्यमातून परत करण्यात आले असून, 14,485 ठेवीदारांच्या क्लेम फॉर्मची पूर्तता झालेली असून, त्यांचे 60 कोटी रुपये डीआयसीजीसीच्या माध्यमातून परत करण्यात येणार असल्याची माहिती बँक प्रशासनाकडून देण्यात आली.

नवीन आर्थिक वर्षामध्ये थकीत कर्ज वसुलीची प्रक्रिया अधिक तीव्र करण्यात येणार असून, अशा कर्जदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. संभाव्य कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी सर्व थकीत कर्जदारांनी थकबाकीची रक्कम लवकरात लवकर भरून बँक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अवसायक गणेश गायकवाड यांनी केले आहे. त्याचबरोबर सर्व खातेदार व ठेवीदार यांनी आपापले केवायसी कागदपत्र नजीकच्या शाखेत जमा करून ठेवी परत मिळविण्यासाठी क्लेम फॉर्मदेखील लवकर भरून द्यावेत, असे आवाहन गायकवाड यांनी केले आहे. थकीत कर्जाची वसुली करून ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करण्यासाठी बँक प्रशासन प्रयत्नशील असल्याचेदेखील गायकवाड यांनी सांगितले.