महाराष्ट्रात 400 पार सभा घ्या आणि जिंकून दाखवा! उद्धव ठाकरेंचं मोदींना आव्हान

मोदींनी महाराष्ट्रात सभा घ्यावी, महाराष्ट्रात 400 पार सभा घ्या आणि निवडणूक जिंकू दाखवा, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी मोदींना जाहीर आव्हान दिलं. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ ऐरोली येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.

मिंध्यांच्या खोकेबाजाची पिसं काढताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ठाणे आणि शिवसेना.. हे नातं म्हणजे शिवसेनेचं ठाणे आणि ठाण्याची शिवसेना असं आहे. काहींना मस्ती आली आहे. त्यांना ठाणे म्हणजे खासगी मालमत्ता वाटते. त्यांची मस्ती उतरवायला मी आलो आहे. आज मला खात्री पटली की मी एकटाच नाही तर तुम्ही सगळे याच साठी आले आहात. यांच्यात समोरासमोर लढायची हिंमत नाही. जो निष्ठावान आहे. तुमच्या पैशांनी तो विकत घेतला जात नाहीत. मढवी सुद्धा तुरुंगात आहेत. पण तिथे गेले नाहीत. मी तुरुंग तसाच ठेवणार आहे, तो फोडणार नाही. उद्या मी त्यांना तुरुंगात टाकीन ज्यांनी मढवीला तुरुंगात टाकला. संजय राऊतांनी सुद्धा तुरुंगवास भोगला. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांना ठणकावून सांगणाऱ्या लोकमान्यांनाही आज महाराष्ट्राचा अभिमान वाटत असेल. कारण, ज्यांना असंतोषाचे जनक म्हणतात. त्याच टिळकांचा महाराष्ट्र आज देशाच्या असंतोषाचा जनक झाला आहे. त्यांनी तेव्हा सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, असा प्रश्न विचारला होता. पण आजच्या सरकारला डोकं नाही, त्याच्या जागेवर खोकं आहे, हे आम्हाला माहीत आहे. हे खोकेबाज सरकार आहे, असा घणाघात त्यांनी केला.

‘माझ्या असली शिवसेनेला नकली म्हणणाऱ्या बेअकली माणसांना मी महाराष्ट्रात सहन करणार नाही. आमचं नाणं खणखणीत आहे, मोदींसारखं तकलादू नाही. तुमचं नाणं चालत नाही, म्हणून तुम्हाला माझ्या वडिलांचा फोटो लावायला लागतो. कधी काळी हे आपल्याला मोदींच्या फोटोंवरून हिणवत होते. मग मी माझ्या वडिलांचा फोटो लावून निवडणूक लढवतोय. इथल्या घटनाबाह्य गद्दार मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वडिलांचा फोटो लावून निवडणूक लढवून दाखवावी. राजकारणातले तुमचे वडील मोदी असतील, त्यांचा फोटो लावा. हिंदुहृदयसम्राटांचा फोटो लावण्याची तुमची पात्रता नाही. कारण, गद्दार म्हटल्यावर त्याच्या हातात भगवा झेंडा आणि सोबत शिवसेनाप्रमुखांचा फोटो शोभत नाही. ही मर्दांची संघटना आहे. आजपर्यंत तुमच्या सगळ्या गोष्टी सहन करत आलो. आता जे सांगताय त्यामुळे भाजपच्या लोकांत संभ्रम निर्माण झाला आहे.’

‘आज देशाच्या सीमा असुरक्षित आहेत. लेह लडाख पेटलंय, मणिपूर पेटलंय, कश्मीरमध्ये पुन्हा हल्ला झाला. कलम 370 काढताना आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला. पण, त्याच काश्मीरमध्ये अजूनही हल्ले होताहेत. गेली दहा वर्षं तुम्ही खुर्च्या उबवताय. कश्मीर का सुरक्षित करू शकला नाहीत. सत्यपाल मलिकांनी पुलवामा हल्ल्याचं बिंग फोडलं. जे सैनिक आपले प्राण तळहातावर घेऊन बलिदान द्यायला तयार असतात. त्यांना तुमच्या नादानपणाने जीव गमवावा लागला. त्यावेळी तुम्ही फोटोग्राफी करत होतात. सत्यपाल मलिकांनी फोन केल्यावर तुम्ही गप्प राहायला सांगितलं. मलिकांनी तुमचं ढोंग उघड केलंय. त्यावर तुम्ही का बोलत नाही?’ असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी यावेळी विचारला.

‘मोदी कधीच महागाई, बेकारीवर बोलत नाहीत. महिला सुरक्षितता, नोकरी यांविषयी बोलताना पाहिलेलं नाही. दहा वर्षं सत्ता भोगल्यानंतर भेकड जनता पार्टी अशी जाहिरात करते की, तुम्हाला कुठे जल्लोष व्हायला हवा आहे, भारतात की पाकिस्तानात. तुमच्या पराभवाने सगळा भारत जल्लोष करणार आहे. गेल्या दहा वर्षांत काय कामं केली तुम्ही? थोडक्यात जो नाही कामाचा तो नाही रामाचा. रामराज्याचा अर्थ सर्व सुखी, आनंदी आणि सुरक्षित आहे. पण तुम्ही काहीच केलं नाही. बेकारी वाढतेय. 80 कोटी लोकांना आम्ही अन्न देतोय म्हणजे एवढे लोक रोज माझ्या दारात भिकेचा कटोरा घेऊन उभे राहिले पाहिजे, हे मोदींचं स्वप्न आहे. मात्र, आमचं हिंदुत्व हृदयात राम आणि हाताला काम असं आहे. पण, एकेकाळी तुमच्या नावाने ओरडणारे आज तुम्हाला हुकूमशहा म्हणताहेत. हा बदल कसा झाला, याचा आढावा तुम्ही घेणार की नाही?’ असंही ते यावेळी म्हणाले.

महाराष्ट्रात सभा घेणाऱ्या मोदींना उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिलं. ते म्हणाले की, मोदींना माझं जाहीर आव्हान आहे. 400पार सभा महाराष्ट्रात घ्या आणि महाराष्ट्र जिंकून दाखवा. महाराष्ट्र कुणावर वार करत नाही. कुणी प्रेमाने मिठी मारली तर तोही प्रेमाने मिठी मारतो. पण पाठीत वार झाला तर वाघनखं बाहेर काढल्याशिवाय राहत नाही. लोकांना तुमचा पैसा, संपत्ती जास्त मुलं होणाऱ्यांमध्ये वाटून टाकणार असं सांगून घाबरवलं जातंय. मोदी तुम्हाला कुणाला किती मुलं होतात, त्याचं काय करायचं आहे. राजकारणात भाजपला मुलं होत नाहीत, त्या माझा काय दोष? मी त्यांना भाकड जनता पक्ष म्हणूनच म्हणतो कारण राजकारणात त्यांना मुलंच झाली नाहीत. आमचीच मुलं कडेवर घेऊन फिरताहेत, असा घणाघाती टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.